राज्यपालांनी धमकी दिली, ममतांचा आरोप
By Admin | Published: July 5, 2017 01:22 AM2017-07-05T01:22:07+5:302017-07-05T01:22:07+5:30
राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी मंगळवारी फोनवर अत्यंत उद्धटपणे बोलून आपला घोर अपमान केला व आपल्याला धमकीही दिली, असा
कोलकाता : राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी मंगळवारी फोनवर अत्यंत उद्धटपणे बोलून आपला घोर अपमान केला व आपल्याला धमकीही दिली, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने व वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी असेही म्हणाल्या की, भाजपाच्या एखाद्या ब्लॉक अध्यक्षाने बोलावे अशा भाषेत बोलून राज्यपालांनी आपला आणि पर्यायाने जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांचा उपमर्द केला.
त्या म्हणाल्या, संपूर्ण आयुष्यात अशा पद्धतीने कोणी मला अपमानीत केले नव्हते... राज्यपाल ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले ते ऐकून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावे, असा विचारही माझ्या मनात आला. राज्यपालांच्या अशा पद्धतीने बोलण्यावर आपण तीव्र नाराजी व्यक्त केली व त्रिपाठी यांनाही कडक भाषेत खडसावले, असे सांगून ममता बॅनजी म्हणाल्या : मी तुमच्या मेहेरबानीने मुख्यमंत्री झालेले नाही, मला लोकांनी सत्तेवर निवडून दिले आहे. त्यामुळे आपण घटनात्मक पदावर असलात तरी लोकनियुक्त मुख्यमंत्र्याशी अशा भाषेत बोलू शकत नाही, असे आपण राज्यपालांना ऐकविले.
याआधीही वाद
याआधी लष्कराने कोलकाता शहरात व खास करून सचिवालयाजवळ ध्वजसंचलन करण्यावरून मुख्यमंत्री बॅनर्जी व राज्यपाल त्रिपाठी यांच्यात जाहीर शाब्दिक चकमक घडली होती.
राज्यपालांकडून इन्कार
कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखली जायला हवी, असे आपण मुख्यमंत्री बॅनर्जी यांना जरूर सांगितले. पण धमकी देऊन त्यांचा अपमान केला, हे मात्र अजिबात खरे नाही, असा खुलासा राज्यपाल त्रिपाठी यांनी केला. त्रिपाठी म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पवित्रा व वापरलेल्या भाषेचे मला आश्चर्य वाटते. अशा प्रकारचे संभाषण गोपनीय स्वरूपाचे असते व त्याची वाच्यता कोणीही करू नये, अशी अपेक्षा असते. ज्याने मुख्यमंत्र्यांना धमकावल्यासारखे किंवा अपमान केल्यासारखे वाटावे, असे त्या संभाषणात मी काहीच बोललो नाही.