राज्यपालांचा ममतांवर मानहानीचा खटला; देशात अशा प्रकारचा पहिलाच खटला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 11:58 AM2024-06-30T11:58:51+5:302024-06-30T11:59:01+5:30
बोस यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या दोन तक्रारी दाखल.
कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांच्याविरुद्ध कोलकाता हायकोर्टात मानहानीचा खटला दाखल केला. मुख्यमंत्र्याविरुद्ध राज्यपालांनी मानहानीचा खटला दाखल करण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरली आहे. लोकसभा निवडणुकांच्या काळात २ मार्च रोजी राजभवनातील अस्थायी कर्मचारी महिलेने राज्यपालांवर छेडछाडीचा आरोप केला होता. ममता बॅनर्जी सरकारने या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडे सोपविल्यानंतर राज्यपालांनी पोलिसांना राजभवनात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपालांवर तोफ डागली होती. राजभवनावर जाण्यास महिला घाबरत आहेत, असे ममता यांनी म्हटले होते. हाच धागा पकडून काही तृणमूल नेत्यांनीही राज्यपालांवर टीका केली होती. या वक्तव्यांवरून राज्यपालांनी आता ममता बॅनर्जी यांच्यासह काही तृणमूल नेत्यांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)
बोस यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या दोन तक्रारी दाखल
दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या दोन तक्रारी दाखल आहेत. २ मे रोजी राजभवनाच्या कर्मचारी महिलेने त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. राज्यपालांनी दि. २४ मार्च आणि २५ मार्च रोजी आपल्याशी गैरवर्तन केले, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या प्रकरणात एका ओडिसी शास्त्रीय नृत्यांगना असलेल्या एका महिलेने दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात लैंगिक शोषण केल्याचा आरोप बोस यांच्यावर केला आहे. याप्रकरणी तिने ऑक्टोबर २०२३ मध्येच तक्रार दाखल केलेली आहे. मात्र या दोन्ही तक्रारींवर कारवाई झालेली नाही.