वंचितांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची - राष्ट्रपती कोविंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:24 AM2018-06-05T00:24:43+5:302018-06-05T00:24:43+5:30
समाजातील वंचितांचे जीवनमान सुधारणे तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. सर्व राज्यपाल व नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद सोमवारपासून राष्ट्रपती भवनात सुरू झाली.
नवी दिल्ली : समाजातील वंचितांचे जीवनमान सुधारणे तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. सर्व राज्यपाल व नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद सोमवारपासून राष्ट्रपती भवनात सुरू झाली.
परिषदेच्या उद््घाटनाच्या कोविंद म्हणाले की, राज्यपाल हा राज्य सरकारचा मार्गदर्शक व संघराज्यपद्धतीतील महत्त्वाचा दुवा असतो. राज्यपाल व राजभवन यांच्याकडे त्या राज्यातील जनता आदर्श व मूल्यांचा स्रोत म्हणूनही पाहत असते.
देशातील एकूण विद्यापीठांपैकी ६९ टक्के राज्य सरकारच्या अख्यत्यारित येतात. ९४ टक्के विद्यार्थी विद्यापीठांत उच्च शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी या विद्यापीठांना कुलपती या नात्याने राज्यपालांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
गांधीजींचे १५० वे जयंती वर्ष
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचा प्रारंभ २ आॅक्टोबरपासून होत असून त्यानंतरच्या दोन वर्षांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. यानिमित्त कोणते उत्तम कार्यक्रम करता येतील याबद्दलच्या सूचना राज्यपालांनी पाठवाव्यात असेही आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.