7000 कोटींची संपत्ती, श्रीराम मंदिरासाठी सर्वात मोठे दान; BJP ने दिली राज्यसभेची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 06:12 PM2024-02-14T18:12:04+5:302024-02-14T18:13:11+5:30
जाणून घ्या कोण आहेत गोविंद ढोलकिया..?
Govind dholakia Rajya Sabha : भारतीय जनता पक्षाने आज गुजरातमधून राज्यसभेवर जाणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यात गुजरातच्या डायमंड सिटीतील प्रतिष्ठित हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया यांचेही नाव आहे. गुजरातमधील राज्यसभेच्या चार जागा रिक्त होत आहेत. मात्र, विधानसभेतील भाजपचे संख्याबळ पाहता राज्यसभा निवडणूक केवळ औपचारिकता मानली जात आहे. पक्षाच्या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
गोविंद ढोलकिया चर्चेत
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा केली, त्यानंतर गुजरातचे डायमंड किंग गोविंद ढोलकिया प्रसिद्धीच्या झोतात आले. याचे कारण म्हणजे, त्यांनी श्रीराम मंदिरासाठी सर्वाधिक 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गोविंद ढोलकिया, हे प्रसिद्ध राम कथाकार मोरारी बापू यांचे अनुयायी मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा दोन दशकांहून अधिकचा परिचय आहे.
कोण आहेत बालयोगी उमेशनाथ महाराज? भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी
नोकरी सोडून बनले डायमंड किंग
7 नोव्हेंबर 1947 रोजी दुधाळा गावात जन्मलेले गोविंद ढोलकिया 'काका' नावाने प्रसिद्ध आहेत. सुरतला डायमंड हब बनवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. श्रीराम कृष्णा एक्सपोर्ट डायमंड कंपनीचे ते मालक आहेत. गोविंद ढेलकिया यांनी फक्त सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 1964 मध्ये त्यांनी सुरतेतून करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी डायमंड कटिंग आणि पॉलिशिंगचे काम केले. काही वर्षांनंतर त्यांनी श्री रामकृष्ण एक्सपोर्ट कंपनीची स्थापना झाली. हिरे व्यवसायात उडी घेतल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
गावाला सोलर व्हिलेज केले
गोविंद ढोलकिया हे मूळचे गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील आहेत. त्यांनी त्यांच्या मूळ गावी दुधाळा येथे सुमारे 850 कुटुंबांना सोनल पॅनेल रूफटॉप भेट दिले आहेत. यासह दुधाळा हे देशातील पहिले गाव ठरले आहे, जे कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय 100 टक्के सौरऊर्जेवर चालते. गोविंद ढोलकिया यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनातील संघर्षाचा उल्लेख केला आहे. त्यांचे आत्मचरित्र 'डायमंड्स आर फॉरएव्हर, सो आर मोरल्स' या नावाने प्रकाशित झाले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गोविंद ढोलकिया यांना सात भाऊ आणि बहिणी आहेत. राम कथाकार मोरारी बापूंच्या शिकवणीचा ढोलकिया यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव आहे.