'या' गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक तपासणी अनिवार्य आणि कायदेशीर होणार, अमित शाहांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 08:28 AM2022-08-29T08:28:52+5:302022-08-29T08:30:42+5:30
Forensic Investigation : गांधीनगरमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (NFSU) च्या दीक्षांत समारंभात अमित शाह उपस्थित होते.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने दोष सिद्ध करण्याचे प्रमाण विकसित देशांपेक्षा जास्त करण्याचे आणि फौजदारी न्याय प्रणालीला फॉरेन्सिक सायन्स तपासाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. गांधीनगरमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (NFSU) च्या दीक्षांत समारंभात अमित शाह उपस्थित होते. यावेळी अमित शाह म्हणाले की, सहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक तपासणी 'अनिवार्य आणि कायदेशीर' करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
सरकार देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये फॉरेन्सिक तपास सुविधा उपलब्ध करून देईल आणि तपासाचे स्वातंत्र्य आणि निष्पक्षता राखली जावी, यासाठी कायदेशीर चौकट तयार केली जाईल. केंद्र सरकार इंडियन पीनल कोड (आयपीसी), कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर (सीआरपीसी) आणि एव्हिडन्स एक्टमध्ये बदल करणार आहे, कारण स्वातंत्र्यानंतर हे कायदे भारतीय परिप्रेक्ष्यातून कोणालाच मिळालेले नाहीत, असे अमित शाह म्हणाले.
अमित शाह पुढे म्हणाले, "स्वतंत्र भारतात हे कायदे नव्याने बनवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स एक्टमधील बदलांसाठी अनेक लोकांचे मत घेत आहोत. याअंतर्गत आम्ही सहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक तपासणी अनिवार्य आणि कायदेशीर करणार आहोत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञांची गरज भासणार आहे. एनएफएसयूमधून पदवी घेतलेला कोणताही विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहणार नाही."
फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करणे, फॉरेन्सिक एक्सपर्ट तयार करणे, फॉरेन्सिक टेक्नॉलॉजी देणे आणि फॉरेन्सिक रिचर्सला चालना देणे यासाठी सरकारने काम केले आहे, जेणेकरून फॉरेन्सिक सायन्सच्या क्षेत्रात देशाला अव्वल स्थानावर नेले जाईल, असे अमित शाह म्हणाले. तसेच, आम्हाला याच्या जोरावर देशातील फॉरेन्सिक सायन्स क्षेत्र मजबूत करायचे आहे. गेल्या तीन वर्षांत या चारही क्षेत्रात खूप काम झाले आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.
दरम्यान, अमित शाह यांनी यावेळी एनएफएसयू येथे डीएनए फॉरेन्सिक सेंटर, सायबर सिक्युरिटी सेंटर आणि सेंटर फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक सायकॉलॉजीचेही उद्घाटन केले. ते म्हणाले, "ही तीन केंद्रे शिक्षण आणि प्रशिक्षणाव्यतिरिक्त संशोधन आणि विकासाचीही प्रमुख केंद्रे असतील. मी तुम्हाला आश्वासन देतो की, संशोधन आणि विकास आणि विकासाच्या क्षेत्रात नवीन प्रवासासह भारत या तिन्ही क्षेत्रात फॉरेन्सिक सायन्सचे ग्लोबल सेंटर होईल."