Gautam Adani: गौतम अदानींना सरकारकडून Z दर्जाच्या सिक्युरिटीला मंजुरी, वाचा महिन्याचा खर्च किती...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:43 PM2022-08-17T18:43:52+5:302022-08-17T18:44:36+5:30
देशातील आघाडीचे उद्योगपती आणि अदानी ग्रूपचे चेअरमन गौतम अदानी यांना केंद्र सरकारकडून झेड सिक्युरिटी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
देशातील आघाडीचे उद्योगपती आणि अदानी ग्रूपचे चेअरमन गौतम अदानी यांना केंद्र सरकारकडून झेड सिक्युरिटी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. अदानींच्या सुरक्षेत आता झेड सिक्युरिटी देणारे सीआरपीएफ जवान तैनात होणार आहेत. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम अदानींच्या झेड सिक्युरिटीमध्ये सीआरपीएफच्या निष्णात जवानांचा समावेश असणार आहे. पण सुरक्षेचा खर्च खुद्द गौतम अदानी यांनाच वैयक्तिक पातळीवर करावा लागणार आहे. अदानींच्या सुरक्षेत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान असतील याचा दरमहिन्याचा खर्च जवळपास १५ ते २० लाख रुपये इतका असणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, गौतम अदानी यांना दिलेली झेड सुरक्षा पूर्णपणे पेमेंट बेसवर असणार आहे. सुरक्षेचा संपूर्ण खर्च त्यांनाच करावा लागेल. या सुरक्षेसाठी दरमहा 15-20 लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. सुरक्षेची श्रेणी जोखमीनुसार ठरवली जाते. धोक्याची शक्यता जितकी जास्त असेल तितकी कडक सुरक्षा दिली जाते.
धोका ओळखून सुरक्षा
एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची धमकी मिळाली आहे आणि प्रकरणाचे गांभीर्य याचा संपूर्ण आढावा घेतला जातो. त्याचा अहवाल गृह मंत्रालयाला दिला जातो. त्यानंतर मध्यवर्ती यादीतील श्रेणीनुसार लोकांच्या सुरक्षिततेचा निर्णय घेतला जातो. ६० वर्षीय गौतम अदानी यांना झेड सुरक्षा मंजूर करण्यात आली आहे. सुरक्षेला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेला म्हणजेच सीआरपीएफला तातडीने काम हाती घेण्यास सांगितलं आहे. यासोबतच गौतम अदानी यांच्या सुरक्षेत सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.
अंबानींनाही मिळालीय झेड दर्जाची सुरक्षा
Z दर्जाच्या वर Z+ ची सुरक्षा आहे, जी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंबानींना धमक्याही येत होत्या. नुकतंच एका धमकीचं प्रकरण समोर आलं असून त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. धोक्याचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारनं २०१३ मध्ये मुकेश अंबानी यांना झेड प्लस सुरक्षा मंजूर केली होती. त्यांच्या सुरक्षेत सीआरपीएफ कमांडोही तैनात आहेत. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र त्यांना झेड प्लसपेक्षा कमी दर्जाची सुरक्षा आहे.
गुप्तचर विभागानं दिला होता इशारा
गौतम अदानी हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून मुकेश अंबानी हे श्रीमंतांच्या यादीत ११व्या स्थानावर आहेत. देशातील महत्त्वाची सुरक्षा एजन्सी आयबीनं गौतम अदानी यांच्या जीवाला धोका असल्याची महत्वाची माहिती दिली होती. याच माहितीच्या आधारावर झेड सिक्युरिटीला मान्यता देण्यात आली आहे. गौतम अदानी यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत जे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या आधारे आयबीने त्यांच्या सुरक्षेबाबतची माहिती सरकारला दिली होती. ही माहिती आठवडाभरापूर्वी सरकारकडे सुपूर्द करण्यात आली होती. आता सरकारनं याला मान्यता दिली असून, त्यानंतर सीआरपीएफ कमांडो गौतम अदानी यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.