पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर UP सरकारची मोठी कारवाई, देशद्रोहाचा खटला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 18:38 IST2021-10-27T18:38:29+5:302021-10-27T18:38:36+5:30
रविवारी दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, यानंतर भारतातील विविध राज्यात फटाके फोडून पाकिस्तानचा विजय साजरा केल्याच्या घटना घडल्या.

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर UP सरकारची मोठी कारवाई, देशद्रोहाचा खटला दाखल
कानपूर: T-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव केला. यानंतर भारतात अनेक राज्यात पाकिस्तानचा विजयोस्तव साजरा केल्याच्या घटना घडल्या. आता विविध राज्य सरकार आणि पोलिस अशा लोकांवर कारवाई करताना दिसत आहे. T-20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांवर योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, अनेकांची धरपकडही सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी आग्रा येथील तीन, बरेलीतील तीन आणि लखनऊमधील एकाची नावे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकचे समर्थन करणारी शिक्षिका ताब्यात
तिकडे, राजस्थानमधील उदयपूरमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाला सपोर्ट करणाऱ्या नफिसा अटारी या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. उदयपूरच्या अंबामाता पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. नफीसाने मॅचनंतर व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानचे समर्थन करणारे एक स्टेटस पोस्ट केले. पाकिस्तानच्या विजयाबद्दल तिने आनंद व्यक्त केल्यानंतर नफिसाला तिच्या शाळेने नोकरीतून काढून टाकले.
काश्मिरी विद्यार्थ्यांवर खटला दाखल
रविवारी दुबईत झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला, फटाके फोडण्यात आले. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील करण नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस श्रीनगर सौरा यांच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचा विजय साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली(UAPA) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.