फ्लेक्स इंजिनाचा वाहनचालकांना पर्याय; नितीन गडकरींची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:25 AM2021-12-18T10:25:00+5:302021-12-18T10:25:44+5:30

केंद्र सरकार काढणार मार्गदर्शक सूचना. दोन वर्षांत इलेक्ट्रिक कार आणि बाईकच्या किमती या पेट्रोल - डिझेलवरील गाड्यांइतकीच होणार असल्याचा गडकरींचा विश्वास.

Govt to bring advisory on flex engines allowing 100 percent ethanol use as fuel' | फ्लेक्स इंजिनाचा वाहनचालकांना पर्याय; नितीन गडकरींची माहिती 

फ्लेक्स इंजिनाचा वाहनचालकांना पर्याय; नितीन गडकरींची माहिती 

googlenewsNext

मुंबई : वाहनांमध्ये इंधनाचा पर्याय देणाऱ्या फ्लेक्स इंजिन बसविण्याबाबतची मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून जारी केली जाणार असल्याचे सांगताना, दोन वर्षांत इलेक्ट्रिक कार आणि बाईकच्या किमती या पेट्रोल - डिझेलवरील गाड्यांइतकीच होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. मुंबईत महामार्ग, वाहतूक आणि लॉजिस्टिक्समधील गुंतवणूकविषयक परिषदेला संबोधित करताना गडकरी बोलत होते. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारमधील परिवहन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ऑनलाइन माध्यमातून परिषदेला संबोधित केले.

रस्ते आणि पायाभूत विकासाच्या कामांतील गुंतवणुकीसाठी चांगला अंतर्गत परतावा मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या आर्थिक व्यवहार्यतेबद्दल शंका न बाळगता गुंतवणूकदारांनी अधिक गुंतवणूक करण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने येत्या दोन ते तीन वर्षात देशभरात सात लाख कोटींची पायाभूत  विकासाची कामे पूर्ण करण्याचे  नियोजन केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, औरंगाबाद, नाशिक व दिघी बंदर औद्योगिक संकुल अशा पाच ठिकाणी मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले. 

राष्ट्रीय वाहनतोड धोरणामुळे प्रदूषणात घट होतानाच सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे. नवीन गाड्यांची मागणी वाढल्याने ऑटोमोबाइल क्षेत्र विस्तारणार आहे. निर्यातीला प्रोत्साहन  मिळणार असून, रोजगाराच्या संधीही वाढतील, असे गडकरी म्हणाले. देशभरात ५० ते ७० मान्यताप्राप्त वाहनतोड यंत्रणा विकसित केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Govt to bring advisory on flex engines allowing 100 percent ethanol use as fuel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.