युपी सरकार म्हणालं PAK मधून येते प्रदुषित हवा; न्यायालयानं विचारलं, "आता तुम्हाला पाक इंडस्ट्री बॅन करायचीये का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 04:09 PM2021-12-03T16:09:16+5:302021-12-03T16:09:43+5:30
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रदुषणाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रदुषणाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. या दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारनं (Uttar Pradesh) सरकारनं पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रदुषित हवेचा दिल्लीवर प्रभाव होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील उद्योगांच्या प्रकल्पातून बाहेर पडणारा धुर दिल्लीच्या बाजूने जात नसून अन्य बाजूला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या सुनावणीदरम्यान काही मजेशीर क्षणही आले. दिल्लीकडे जाणारी हवा ही उत्तर प्रदेशाकडून येत नाही. ती पाकिस्तानकडून येत आहे, असं उत्तर प्रदेश सरकारचे वकील रंजीत कुमार म्हणाले. तर आता तुम्हाला पाकिस्तानातील उद्योग बंद करावायचे आहेत का? असा मजेशीर प्रश्न सरन्यायाधीश सीव्ही रमण्णा यांनी केला.
पुढील शुक्रवारी सुनावणी
सर्वोच्च न्यायालायात आता प्रकरणाची सुनावणी पुढील शुक्रवारी होणार आहे. साखर आणि दुधाचे उद्योग अधिक वेळेपर्यंत सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी टास्क फोर्स कमिटीसमोर अर्ज देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला दिले. याशिवाय, न्यायालायानं दिल्ली सरकारद्वारे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयांच्या उभारणीचं काम सुरू ठेवण्याचीही परवानगीही दिली.
दिल्ली सरकारनं प्रदुषणाच्या बाबतीत उचलल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. CAQM च्या निर्देशानुसार शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु आता परिस्थितीत सुधारणा होत नाही, तोवर शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं. याशिवाय केंद्राकडूनही उचलल्या जाणाऱ्या पावलांबाबत न्यायालयाला माहिती दिली.