गरीब कुटुंबांना केंद्र सरकारचे गिफ्ट, स्वस्त दरात मिळणार इंडक्शन किंवा सोलर कुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:52 AM2018-08-31T06:52:54+5:302018-08-31T06:56:17+5:30
ऊर्जा मंत्रालयाची योजना; लोकसभा निवडणुकांच्या आधी केले जाणार लाभार्थ्यांना वाटप
नवी दिल्ली : ज्यांच्या घरात वीज पोहोचली वा पोहोचणार आहे, अशा ग्रामीण भागांतील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी सरकार सोलर वा इंडक्शन कुकर स्वस्त दरात देणार आहे. ऊर्जा मंत्रालयाची ही योजना आहे. नव्या वर्षात लोकसभा निवडणुकांच्या आधी या कुकरचे वितरण सुरू होईल. ऊर्जा मंत्रालयाच्या ईईएसएल या सरकारी कंपनीकडे वितरणाचे काम सोपवले जाईल.
ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी सर्व राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांना प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने यंदाच्या ३१ डिसेंबरपर्यंत प्रत्येक घरात विजेचे बल्ब पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला गॅस योजनेचा देशभर जोरदार प्रचार घडवून आणला आणि साडेतीन कोटी ग्रामीण कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले. पण पहिला सिलेंडर संपल्यावर दुसरा सिलेंडर घेण्यासाठी पैसेच नसल्याने अनेक कुटुंबांच्या घरात उज्ज्वला योजनेचे रिकामे सिलेंडर पडून आहेत, ही बाब नंतर लक्षात येऊ लागली. त्यानंतर गरीब कुटुंबांना त्यांचे गॅस सिलेंडर बदलावे लागू नयेत यासाठी इंडक्शन किंवा सोलर कुकर पुरवण्याचा पर्याय पुढे आला आहे. यामुळे देशाचा इंधन आयातीवर होणारा खर्चही कमी करता येईल, असे सिंह यांचे मत आहे.
खर्चही वाचणार
इंडक्शन कुकर व सोलर कुकर वापरण्यास प्रोत्साहन दिल्याने पर्यावरणाचे नुकसान टळेल व देशाचे इंधन आयातीचे बिलही कमी होईल, असे सिंह म्हणाले.