घुमली नामाची गुरुवाणी
By admin | Published: April 4, 2015 05:20 AM2015-04-04T05:20:02+5:302015-04-04T05:20:02+5:30
आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले
अविनाश थोरात, घुमान (संत नामदेव नगरी)
आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले, अशी टीका ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केली.
तब्बल १५ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी भरलेल्या भव्य सभामंडपात महाराष्ट्र आणि पंजाबमधील अनुबंधाचा हा अनोखा सोहळा थाटात सुरू झाला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, स्वागताध्यक्ष भारत देसडला, संमेलनाचे संयोजक ‘सरहद’चे संजय नहार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष
सुनील महाजन, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आदी या वेळी
उपस्थित होते. मावळते संमेलनाध्यक्ष
फ. मुं. शिंदे यांनी मोरे यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सुपुर्द केली.
‘पुंडलिक वरदा’, असे म्हणत मोरे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी घुमान, पंजाब व महाराष्ट्राचा अनुबंध विस्ताराने उलगडला. नाचणे व वाचण्यात भेद नाही. ज्ञान व आनंदात द्वंद्व नसते. त्यामुळे साहित्याचा उत्सव करण्यात गैर नाही. वारकरी संप्रदायाचे साहित्य हाच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे.
नामदेवांच्या नगरीत होत असलेले हे संमेलन गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. हा मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार आहे, त्यामध्ये काहीही गैर नाही, असे त्यांनी सांगितले.