मुख्यमंत्र्यांना गोयल यांची धमकी
By admin | Published: September 8, 2014 03:09 AM2014-09-08T03:09:36+5:302014-09-08T03:09:36+5:30
वीज पुरवठ्याच्या मुद्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अकारण राजकारण केल्याचा आरोप ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केला
फराज अहमद, नवी दिल्ली
वीज पुरवठ्याच्या मुद्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अकारण राजकारण केल्याचा आरोप ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केला. चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयात मंत्री असताना या कार्यालयाने खासगी कंपन्यांना कोळसा खाणपट्टे वाटप करण्यासारखे वादग्रस्त निर्णय घेतले होते, याचे स्मरण करवून देत गोयल यांनी चव्हाणांना उघडे पाडण्याची धमकीही दिली. कोळसा खाणपट्ट्यांच्या मुद्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयाने छाननी चालविली आहे.
१०० दिवसांच्या उपलब्धीबाबत त्यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे देशातील १३ केंद्रांवर पत्रपरिषद घेतली. मुंबई, नागपूर, पुणे या शहरांचा त्यात समावेश होता. महाराष्ट्राचा वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असून त्यामागे राजकीय कट असल्याचा आरोप करणारे पत्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते. त्यावर गोयल यांनी हा राज्य आणि काही खासगी कंपन्यांमधील वाद असून त्याच्याशी सरकारला काहीही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट केले. वीज संकटाबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार गंभीर नाही.
कोळसा आणि ऊर्जामंत्री बनल्यानंतर मी मुख्यमंत्री चव्हाण यांना भेटण्याचे वारंवार प्रयत्न केले पण काही कारणांनी त्यांनी मला भेटीची वेळ दिलेली नाही. आतापर्यंत माझी १७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तेलंगणचे मुख्यमंत्री राव हे १८ वे मुख्यमंत्री ठरले. त्यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली, अशी माहिती गोयल यांनी दिली.