गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस-भाजपात खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:36 AM2018-05-02T01:36:41+5:302018-05-02T01:36:41+5:30
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस आणि भाजपात खडाजंगी सुरू झाली आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस आणि भाजपात खडाजंगी सुरू झाली आहे. अलीकडेच, फ्लॅशनेट इन्फो सोल्युशन आणि शिर्डी इंडस्ट्रीज् या कंपन्यांशी संबंधित व्यावहारिक कागदपत्रे उघड झाली होती. भाजपाने २८ एप्रिल रोजीच या अनुषंगाने गोयल यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.
भाजपाने दस्तावेज जारी करून दावा केला होता की, फ्लॅशनेटचे शेअर्स जुलै २०१४मध्ये विकण्यात आलेहोते. २९ सप्टेंबर २०१४ रोजी नाही. काँग्रेसने उत्तर देत सरकारी कागदपत्रेच जारी केली आहेत. त्यानुसार शेअर्सची विक्री २९ सप्टेंबर २०१४ रोजी करण्यात आली. हाच दावा काँग्रेसने यापूर्वीच केला होता. फ्लॅशनेटचे २७०१० शेअर पीयूष गोयल यांनी विकले होते, तर त्यांच्या पत्नी सीमा गोयल यांनी २३०१० शेअर्स पीरामल स्टेट प्रा. लिमिटेडला विकले होते, तसेच शिर्डी इंडस्ट्रीज्बाबत भाजपाचा दावा फेटाळत काँग्रेसने कागदपत्रे जारी करून भाजपा पीयूष गोयल यांना वाचविण्यासाठी खोटी कागदपत्रे जारी करीत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला.
२०१४मध्ये पीयूष गोयल यांनी आपली संपत्ती जाहीर करताना त्यात फ्लॅशनेटचा उल्लेख नव्हता. ३१ मार्च २०१५ रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे संपत्तीचे विवरण सादर करेपर्यंत त्यांनी फ्लॅशनेटचे शेअर्स विकलेले होते. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी या व्यवहाराशी संंबंधित कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी केली आहे. फ्लॅशनेट इन्फो सोल्युशनचा मूल्यांकन अहवाल जाहीर करण्यात गोयल का कचरत आहेत, असा सवालही त्यांनी केला. सत्य समोर आणण्यासाठी पंतप्रधानांनी पीयूष गोयल यांच्या व्यावसायिक सौद्याशी संबंधित तपशील असलेली कागदपत्रे जाहीर करावीत, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.