निम्म्याच टँकरवर जीपीएस यंत्रणा
By Admin | Published: June 11, 2014 12:24 AM2014-06-11T00:24:08+5:302014-06-11T00:26:38+5:30
बीड : टँकरच्या बनावट फेऱ्यांना अंकुश लागावा यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला;
बीड : टँकरच्या बनावट फेऱ्यांना अंकुश लागावा यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला; परंतु निम्म्याच टँकरवर यंत्रणा कार्यान्वित आहे़ दरम्यान, जीपीएस न बसविणाऱ्या कंत्राटदारांना सीईओंनी पत्र पाठवून देयके रोखण्याची तंबी ़दिली आहे़
टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी टँकर लावले जातात़ मात्र, कंत्राटदार कमी फेऱ्या असतानाही त्या जास्त दाखवून नियमांचे उल्लंघन करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ अशा गैरप्रकारांना पायबंद लागावा म्हणून जीपीएस (ग्लोबल पोझिशन्स सिस्टम) नावाची यंंत्रणा अस्तित्वात आली़ या यंत्रणेमुळे टँकरच्या फेऱ्यांचे चित्रीकरण होणे सुकर झाले़ त्यामुळे जीपीएसवरील नोंदीप्रमाणेच बिल काढण्यात येणार होते़
जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा यंदा टंचाईच्या झळा कमी होत्या़ आजघडीला एकूण १६२ टँकरने पाणीपुरवठा केला जातो; परंतु त्यापैकी केवळ ८१ टँकरवरच जीपीएस यंत्रणा लावली आहे़ उर्वरित ८१ टँकर अद्यापही विना जीपीएस धावत आहेत़ दरम्यान, जीपीएस यंत्रणेसाठी नोडल अधिकारी म्हणून सीईओ राजीव जवळेकर यांची नियुक्ती केलेली आहे़ शिवाय जीपीएसवर नियंत्रण ठेवण्यासाठी जि़प़ च्या पाणीपुरवठा विभागात उपकरण ठेवले आहे़ तेथे वेळोवेळी कुठल्या टँकरला जीपीएस यंत्रणा लावली किंवा नाही हे तपासले जाते. त्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पाठविला जातो. जिल्हाधिकारी राम यांनी देखील जीपीएस संदर्भात यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत.
जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली नाही म्हणून ३० एप्रिल रोजी कंत्राटदार एच़ पी़ घुमरे यांना राजीव जवळेकर यांनी एक पत्र दिले आहे़ जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा देयके रोखण्यात येतील, असा इशारा जवळेकर यांनी या पत्रात दिला आहे़
कंत्राटदार एच़पी़ घुमरे म्हणाले, जीपीएस यंत्रणा सुरुवातीला काही टँकरवर कार्यान्वित नव्हती;पण आता सर्व टँकरवर यंत्रणा बसविली आहे़ शासन नियमांचे कोठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले़
‘बीडीओं’ना सूचना
यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आऱ डी़ वहाने म्हणाले, गेल्या आठवड्यातच सर्व गटविकास अधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे़ जीपीएस यंत्रणेशिवाय एकही टँकर धावता कामा नये, अशा सूचना दिलेल्या आहेत़ जेथे कुठे टँकरला जीपीएस यंत्रणा कार्यान्वीत केली नाही तेथील अहवाल मागवून नंतर कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)
जीपीएस कोठे?
तालुका टँकरसंख्या
पाटोदा ६
शिरुर ५
धारुर ५
गेवराई ३
बीड २४
आष्टी ३३
केज ५
कारवाई करण्याची भाजयुमोची मागणी
भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राम खाडे म्हणाले, जीपीएस यंत्रणेला खोडा घालण्यामागे ‘अर्थ’कारण आहे़ अधिकारी व कंत्राटदारांच्या संगणमताने जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ नियम डावलणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच कंत्राटदारांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे़