जीपीएसमुळे महागणार मोबाइल
By admin | Published: July 10, 2017 04:26 PM2017-07-10T16:26:49+5:302017-07-10T16:56:16+5:30
आता सर्वसामान्य नागरिकांना साधे फोन मिळण्याऐवजी जीपीएस असलेले महाग फोन घ्यावे लागतील
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.10- दूरसंचार विभागाच्या निर्णयामुळे मोबाइल हॅंडसेटची किंमत वाढणार आहे. इंडियन सेल्युलर असोसिएशनची (आयसीए) याचिका दूरसंचार खात्याने आज फेटाळून लावली आहे. 1 जानेवारी 2018 पासून प्रत्येक हॅंडसेटमध्ये जीपीएसची सोय असणे बंधनकारक करण्याच्या आपल्या निर्णयावर दूरसंचार विभाग ठाम राहिला आहे. या निर्णय़ावर पुनर्विचार करण्याची मागणी आयसीएने केली होती. परंतु महिलांच्या संरक्षणासाठी मोबाइलमध्ये जीपीएसची सोय असणे अत्यावश्यक असल्याची भूमिका दूरसंचार विभागाने कायम ठेवली आहे. आयसीएची विनंती फेटाळून लावताना या विषयावर यापुढे कोणत्याही प्रकारचे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही असेही विभागाने स्पष्ट केले आहे. आता जीपीएसची सोय प्रत्येक मोबाइलमध्ये करावी लागल्यामुळे साहजिकच हॅंडसेटची किंमत वाढणार असून, सर्वसामान्य नागरिकांना साधे फोन मिळण्याऐवजी असे जीपीएस असलेले महाग फोन घ्यावे लागतील.
1 जानेवारी 2018 पासून पॅनिक बटणासह प्रत्येक मोबाइलमध्ये जीपीएसची सोय असलीच पाहिजे असा नियम एप्रिल 2016मध्ये दूरसंचार विभागाने जाहीर केला होता. त्यावर भारतात आता कुठे दूरसंचार क्षेत्र वेगाने विकसित व्हायला लागले असताना, साध्या फोन्समध्येही जीपीएस लावल्यामुळे त्याच्या किमती वाढतील आणि त्याचा फटका पूर्ण दूरसंचार उद्योगाला बसेल अशी भीती आयसीएने ट्राय (दूरसंचार नियामक मंडळ)कडे केली होती. तसेच या नियमावर पुनर्विचार करण्याचे आदेश ट्रायने दूरसंचार विभागाला द्यावेत अशी विनंती केली होती. त्यानंतर दूरसंचार खात्याचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांना पत्र लिहून, या निर्णयामुळे 500 ते 700 रुपयांमध्ये मिळणाऱ्या हॅंडसेटची किंमत 950 ते 1150 इतकी होईल असेही सांगितले होते.