१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 07:24 AM2024-06-14T07:24:43+5:302024-06-14T07:25:01+5:30

NEET Exam: एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल.

Grace Marks of 1,563 Candidates Canceled, Central Govt Information in Supreme Court; Re-examination of 'NEET' on 23rd June | १,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी

१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी

नवी दिल्ली - एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल. यापैकी ज्या उमेदवारांनी फेरचाचणी न दिल्यास ग्रेस गुण वगळून मूळ गुणांच्या आधारे निकाल दिला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.

नीट-युजीतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारांमुळे ही परीक्षा रद्द करण्यासह ग्रेस गुणांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल होत्या. त्यावर न्यायमूर्ती विक्रम नाथ व संदीप मेहता यांच्या  खंडपीठापुढे सुनावणी झाली. याआधी खंडपीठाने परीक्षा रद्द न करता प्रवेशासाठीच्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देणार नसल्याचे म्हटले होते. तसेच केंद्र सरकार व एनटीएला उत्तर देण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी केंद्राच्या वकिलांनी बाजू मांडली. 

गैरप्रकार उघड करणारे अलख पांडे कोण आहेत? 
नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि १५६३ उमेदवारांना ग्रेस गुण देण्याविरोधात लढा देत अलख पांडे यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले. पांडे हे फिजिक्सवाला या नामवंत कोचिंग क्लासेसचे संस्थापक आहेत.  २०२० मध्ये पांडे यांनी किफायतशीर दरात विद्यार्थ्यांना जेईई-नीट परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी फिजिक्सवाला कोचिंगची स्थापना केली. 
२०१५ मध्ये आयआयटी कानपूर येथून बी.टेकची पदवी घेतल्यानंतर तिथेच विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये यूट्युबच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. बघता-बघता त्यांची लोकप्रियता इतकी वाढली, सध्या त्यांच्या यूट्युबचे ६९ लाख सबस्क्रायबर आणि ५० लाख ॲप डाऊनलोड झाले आहेत.

नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) २३ जूनला फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत परीक्षा होईल. पुनर्परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाईल आणि एमबीबीएस, बीडीएस, इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे समुपदेशन ६ जुलैपासून सुरू होईल, असे केंद्र सरकारने सांगितले. याचिकेवरील पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे. 

बंगालमध्ये निदर्शने 
नीट-यूजी परीक्षेतील कथित अनियमिततांबद्दल पश्चिम बंगाल उच्च शिक्षण विभागाच्या सॉल्ट लेक येथील मुख्यालयाजवळ ‘ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन’च्या सदस्यांनी निदर्शने केली. विकास भवनाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून दूर नेले.

संसदेत काँग्रेस प्रश्न उपस्थित करणार  
काँग्रेसने नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. याचा संताप संसदेतही घुमेल असे सांगितले. काँग्रेसने एनटीएच्या महासंचालकांना हटविण्याची मागणीही केली. 

नीट-यूजी परीक्षेत पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा नाही. विरोधकांकडून केले जाणारे आरोप निराधार आहेत. एनटीए ही अतिशय विश्वासार्ह संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे आणि आम्ही त्याच्या निर्णयाचे पालन करू. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
- धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री

Web Title: Grace Marks of 1,563 Candidates Canceled, Central Govt Information in Supreme Court; Re-examination of 'NEET' on 23rd June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.