आधारची माहिती देण्यास घासलेटधारक अनुत्सुक
By admin | Published: November 5, 2016 02:06 AM2016-11-05T02:06:47+5:302016-11-05T02:33:14+5:30
कोटा ठरविण्यात अडचणी : पुरवठा विभाग पेचात
नाशिक : घासलेट घेण्यास पात्र ठरलेल्या व्यक्तींचे आधारक्रमांक गोळा करण्याचे व जे देणार नाही त्यांचे घासलेट चालू नोव्हेंबर महिन्यापासून बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, घासलेट घेणाºयांनी आधार क्रमांक देण्यास नकार दिला आहे. आधारक्रमांक दिल्यास भविष्यात गॅसचेही अनुदान बंद होण्याची भीती त्यातून व्यक्त केली जात आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गेल्या आठवड्यात घासलेट वापरणाºया ग्राहकांची माहिती मागविण्याच्या सूचना सर्व जिल्हा पुरवठा अधिकाºयांना केल्या आहेत. तत्पूर्वी अशाच प्रकारे घरगुती गॅसचा वापर करणाºया ग्राहकांची माहिती व आधारक्रमांक मागविण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु गॅस एजन्सीचालक वा तेल कंपन्यांकडे अशा प्रकारची माहिती नसल्याने रेशन दुकानदारांकडून अंदाजेच माहिती पाठवून घासलेटचा कोटा निश्चित करण्यात आला होता. आता मात्र ज्यांना घासलेट दिले जाते अशा ग्राहकांकडूनच त्यांचा आधारक्रमांक घेण्यात यावा व जे देणार नाहीत, त्यांचे घासलेट नोव्हेंबरपासून बंद करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. सदरची माहिती ३१ आॅक्टोबरपर्यंत गोळा करण्याची मुदतही शासनाने घालून दिली होती, प्रत्यक्षात अशा प्रकारची माहिती गोळा करण्यास घासलेट विक्रेतेच उदासीन असून, घासलेट ग्राहकांनाही अशा प्रकारची माहिती देण्यामागे धोका दिसू लागला आहे. घासलेट विक्रेत्यांना नागरिकांकडून माहिती गोळा करणे कटकटीचे काम वाटत असून, अशा प्रकारची माहिती शासनाला सादर केली व त्यातून ग्राहकाचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याचे खापर फुटण्याची चिंताही विके्रत्यांना भेडसावू लागली आहे. (प्रतिनिधी)