गे्रट भेट - उद्यम नगरी
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:45+5:302015-02-14T23:51:45+5:30
Next
>पूजा दामले .................कल्पकतेच्या बळावर पारंपरिक गोष्टींमध्येही अभिनव प्रयोग करता येतात आणि अशाच वस्तू सण-समारंभांत लक्ष वेधून घेतात. लग्नकार्यात भेट म्हणून पैसे पाकिटात घालून दिले जातात. अनेक प्रकारची, रंगांची पाकीटे बाजारात उपलब्ध असतात. पण आपलं पाकिट हे आणखी १०० पाकिटांपैकीच एक असतं. त्यामुळे पैसे काढून घेतले की पाकीट केराच्या टोपलीत जाते. ही आठवण जपून ठेवली जावी म्हणून अंधेरीच्या मकरंद करंदीकर यांनी पाकिटांनाच एक वेगळा लूक दिला. त्यांनी तयार केलेली अशी पाकीटे अनेकांनी आजही जपून ठेवली आहेत. ...मकरंद यांच्याकडे प्रत्येक प्रसंगानुसार वेगवेगळी पाकिटे उपलब्ध आहेत. म्हणजे लग्नासाठी लाल रंगाचे जाड कागदाचे पाकीट तयार केले जाते. त्यावर मुंडावळ्या आणि हळदी - कुंकू लावले जाते. आणखी एक प्रकार म्हणजे फेटा तयार करून अथवा रेडीमेड छोटा फेटा आणून पाकीटावर चिकटवला जातो. लग्नात वधू- वरांच्या आयुष्याची गाठ बांधली जाते. त्यामुळेच त्यांना शुभार्शिवाद देताना पाकीटवर शेला - शालूची गाठ असलेली सजावट केली जाते. देवांसाठी बाजारात मिळणार्या वस्त्रांपासून अथवा भरजरी जुन्या साड्यांपासून हे शालू आणि शेले तयार केले जातात.मुंजीसाठीच्या पाकीटाला जानवे लावले जाते. यू आकाराचा टिळा काढतात. उत्तम यश संपादन केल्यानिमित्त भेट द्यायची असले तर पाकीट वेगळ्या पद्धतीने सजवले जाते. यावेळी पाकीटाच्या एका बाजूला मोरपिस लावून त्याच्या बाजूला १ आकड्याची सरस्वती काढली जाते. किंवा एखाद्या पाकीटाला पाटीचा आकार दिला जातो, आणि त्यावर संदेश लिहून दिला जातो. पत्त्यातला एक्का तयार करून असेच यश संपादन करत रहा, अशाही शुभेच्छा दिल्या जातात. नारळापासूनही उत्तम भेटवस्तू तयार करता येते. नारळ हे मांगल्याचे प्रतिक मानले जाते. नारळाचे दोन समान भाग होतील असा तो फोडून घेतला जातो अथवा छोट्या करवतीने कापून घेतला जातो. खोबरे काढून स्वच्छ केला केला जातो. नारळाची शेंडी ठेवून इतर नारळाचा भाग वरून स्वच्छ तासून घेतला जातो. दागिन्याच्या डब्याची कडी नारळाला चिकटवली जाते. सोनेरी रंग दिला जातो अथवा स्प्रे केला जातो. यानंतर त्याला मणी, खडे चिकटवून सजवले जाते. शेंडीला मोत्यांच्या माळा जोडल्यास नारळ आणखीनच आर्कषक दिसतो. काहीवेळा पैसे घेणारच नसतील आणि गृहप्रवेश किंवा तसाच कोणता सोहळा असेल, तर त्यांना छोटी पालखी तयार करून दिली जाते. काहीवेळा पुस्तक तयार केले जाते. आतमध्ये त्या व्यक्तीचे फोटो किंवा आठवणी लिहील्या जातात. अशा अनेक आठवणीत राहणार्या युनिक भेटवस्तू बनवल्या जातात. या व्यवसायामुळे अनेकांना काम मिळाले आहे.