चीन-पाकिस्तानवर भारी पडणारा ग्लाइड बॉम्ब, भारताच्या DRDO ने विकसित केले स्मार्ट वेपन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 01:58 PM2017-11-04T13:58:33+5:302017-11-04T14:05:17+5:30
रणांगणात शत्रूच्या सैन्याला सळो कि पळो करुन सोडणा-या ग्लाइड बॉम्बची शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
नवी दिल्ली - रणांगणात शत्रूच्या सैन्याला सळो कि पळो करुन सोडणा-या ग्लाइड बॉम्बची शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे स्मार्ट वेपन डीआरडीओने विकसित केले आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानाने ग्लाइड बॉम्ब टाकल्यानंतर या बॉम्बने प्रसिजन नेवीगेशन सिस्टिमच्या आधारे 70 किलोमीटरच्या टप्प्यातील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या ग्लाइड अस्त्रामुळे भारताची चीन-पाकिस्तानविरोधात क्षमता अधिक वाढणार आहे.
हे स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन आहे. ग्लाइन बॉम्बच्या घेण्यात आलेल्या तीन चाचण्या यशस्वी ठरल्या. या बॉम्बच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओ आणि इंडियन एअर फोर्सचे अभिनंदन केले. यशस्वी चाचणीमुळे ग्लाइड बॉम्बचा भारतीय हवाई दलात समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
2013 मध्ये अशा प्रकारचा बॉम्ब विकसित करायला मंजुरी मिळाली होती. मागच्यावर्षी मे महिन्यात डीआरडीओने जॅग्वार विमानातून या बॉम्बची पहिली चाचणी केली होती.
काय आहे या बॉम्बचे वैशिष्टय
ग्लाइड बॉम्बचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा बॉम्ब ठरलेल्या टार्गेटवर वरुन टाकावा लागत नाही. काही अंतरावरुन डागल्यानंतरही हा बॉम्ब शत्रूच्या तळांचा अचूक वेध घेतो. त्यामुळे आपल्या विमानाला असलेला धोका कमी होतो. जागतिक महायुद्धामध्ये सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारच्या बॉम्बचा वापर झाला होता. आता नवीन बदलांमुळे हे अस्त्र अधिक प्रभावी बनले आहे.