भारतीय लसीला मोठी जागतिक मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 02:37 AM2021-01-15T02:37:35+5:302021-01-15T02:40:00+5:30
चिनी लसीची कार्यक्षमता ५० टक्क्यांच्या खाली
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : ब्राझील आणि इतरत्र चीनच्या कोरोना विषाणूवरील ‘कोरोना व्हॅक’ लशीच्या चाचण्यांदरम्यान कार्यक्षमतेबद्दल संशय वाढत असताना आता भारतीय लशींसाठी वेगवेगळे देश माहिती घेत आहेत. कोरोना व्हॅक या लशीची निर्मिती बीजिंगस्थित सिनोव्हॅकने केली असून तिची कार्यक्षमता फक्त ५० टक्के दाखवल्याची वृत्ते समोर येत असल्यामुळे हे देश आता लशीसाठी भारताचे दार ठोठावत आहेत. भारत हा एक फार मोठा लस पुरवठा करणारा देश आहे.
सीरम कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने गॅवी-कोव्हॅक्सशी ४०० दशलक्ष मात्रा बांगलादेशला पुरवठा करण्यासाठी सहमती करार आधीच केलेला आहे. चीनच्या लशीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या ब्राझील, इंडोनेशिया आणि इतर दहा देशांत मात्र पेचप्रसंग निर्माण होत आहे. ते कोरोना व्हॅकच्या ४०० दशलक्ष मात्रा विकत घेण्यास आधीच तयार झाले असून आता त्यांना पर्यायी लशींही हव्या आहेत. भारत बायोटेक सध्या कोव्हॅक्सीनच्या पुरवठ्यासाठी ब्राझीलशी चर्चा करत असल्याचे सूत्रांकडून समजते. भारतीय लस निर्मात्यांना भारत सरकारने देशातील मागणी पूर्ण झाल्यानंतर लस निर्यात करण्यास तत्वत: परवानगी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लस व्यवस्थापनावरील परराष्ट्र मंत्रालय आणि डॉ. व्ही. के. पॉल अध्यक्ष असलेल्या त्यांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांमार्फत या प्रक्रियेत अतिशय सक्रिय आहेत.
सीरम कंपनीची क्षमता ही महिन्याला १०० दशलक्ष मात्रा निर्माण करण्याची आहे. कंपनीला गॅवीला लशींचा पुरवठा करण्यासाठी बिल गेट मेलिंडा फौंडेशनकडून ३०० दशलक्ष डॉलर्सचा निधीही मिळाला आहे. भारत बायोटेक कंपनीची वार्षिक १०० दशलक्ष मात्रा निर्मितीची क्षमता असून ती २०० दशलक्ष एवढी वाढवू शकते. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनची निर्यात श्रीलंका, मालदिव्हज, अफ्रिकन आणि दक्षिण अमेरिकन देशांना करता येईल, असे सरकारने म्हटले. नंतरच्या टप्प्यात भूतान, नेपाळ, अफगाणिस्तान आणि म्यानमारलाही जहाजे पोहोचतील. ‘सार्क’ देशांच्या नेत्यांशी नरेंद्र मोदी याबाबत आधीच बोलले होते. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण गेल्या आठवड्यात कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीनच्या निर्यातीवर बंदी नाही परंतु, भारताच्या गरजेला प्रथम प्राधान्य असेल, असे म्हणाले होते.
केनियामध्ये आढळला कोरोनाचा नवा विषाणू
नैरोबी : ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या विषाणूंनी जगभरात धुमाकूळ घातला असतानाच आफ्रिका खंडातील केनिया या देशात कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू आढळला आहे. केनियातील या नव्या विषाणूचे अस्तित्व इतर कोणत्याही देशात अजूनतरी आढळून आलेले नाही.
केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी कोरोनाचा हा नवा विषाणू शोधून काढला. दक्षिण तैता तावेता प्रांतातील रुग्णांमध्ये कोरोनाच्या या नव्या विषाणूचे अस्तित्व आढळले. या विषाणूची संसर्गशक्ती किती विनाशी आहे याचा संशोधक सध्या अभ्यास करीत आहेत. जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळलेल्या विषाणूंवर केनियातील शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेमधील नव्या कोरोना विषाणूची संसर्गशक्ती मूळ विषाणूपेक्षा खूपच अधिक आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा फैलावही वेगाने होतो. ब्रिटनमध्ये दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली होती. त्यामुळे त्या देशात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.