थोर चित्रकार रझा यांचे निधन
By admin | Published: July 24, 2016 05:20 AM2016-07-24T05:20:00+5:302016-07-24T05:20:00+5:30
जिवंतपणीच आख्यायिका बनून राहिलेले थोर चित्रकार सैयद हैदर उर्फ एस. एच. रझा यांचे शनिवारी सकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय चित्रकलेची पताका गेली सात दशके
नवी दिल्ली : जिवंतपणीच आख्यायिका बनून राहिलेले थोर चित्रकार सैयद हैदर उर्फ एस. एच. रझा यांचे शनिवारी सकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय चित्रकलेची पताका गेली सात दशके जगभर फडकत ठेवणारे आणि खास करून प्राचीन भारतीय आध्यात्म व तत्त्वज्ञानाला कुंचल्यातून अभिव्यक्त करणाऱ्या या कलावंताच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनामुळे आधुनिक चित्रकलेचा एक देदिप्यमान कालखंड अस्ताला गेल्याची भावना व्यक्त केली.
रझा ९४ वर्षांचे होते. गेले दोन महिने खासगी इस्पितळाच्या अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, असे त्यांचे निकटचे मित्र अशोक वाजपेयी यांनी सांगितले. रझा यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंत्यसंस्कार मध्य प्रदेशच्या मंडला जिल्ह्यातील बाबरिया या जन्मगावी करण्यात येतील. कलाशिक्षणासाठी पॅरिसला गेलेले रझा, त्यानंतर सुमारे सहा दशके फ्रान्समध्येच स्थायिक झाले, पण मातृभूमीशी त्यांची नाळ तुटली नाही. आयुष्याची शेवटची २० वर्षे ते दिल्लीत येऊन राहिले. त्यांची चार भावंडे फाळणीनंतर पाकिस्तानात गेली, पण रझा शेवटपर्यंत अस्सल भारतीयच राहिले.
प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप
‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट््स ग्रुप’ या आधुिनक भारतीय कलाचळवळीचे अर्ध्वयू या नात्याने भारतीय चित्रकलेत १९४७ ते १९५६ या काळात केलेले क्रांतिकारी कामही रझा यांची कलाक्षेत्राला मोठी देणगी म्हणावी लागेल. के.एच. आरा आणि एफ. एन. सुझा यांच्यासह त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीने मध्यंतरीच्या वसाहतवादी काळात भारतीय चित्रकलेवर उमटलेला युरोपीय वास्तववादी ठसा पुसून टाकला आणि भारतीय आध्यात्म व तत्त्वज्ञानाच्या आत्मज्ञानाला चित्रकलेच्या केंद्रस्थानी आणले.
सर्वात मौल्यवान चित्र : रझा यांचे ‘सौराष्ट्र’ हे चित्र सर्वात मौल्यवान चित्र. सन १९८३ मध्ये त्यांनी काढलेले हे चित्र ख्रिस्तीजने २०१० मध्ये घेतलेल्या लिलावात ३.५ दशलक्ष डॉलरना (सुमारे १६ कोटी रु.) विकले गेले. मध्य प्रदेशातील घनदाट अरण्यात घालविलेल्या बालपणातून त्यांना या चित्राची स्फूर्ती मिळाली.