प्रचंड अस्वस्थता, झोपही नाही लागली! जाणून घ्या, तुरुंगातल्या 14X8 च्या सेलमध्ये केजरीवालांची पहिली रात्र कशी गेली?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 02:11 PM2024-04-02T14:11:09+5:302024-04-02T14:11:44+5:30
ते रात्री उशीरापर्यंत सेलमध्ये फिरताना दिसले. त्यांची शुगर लेवलही बरीच कमी झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना आवश्यक ती औषधेही देण्यात आली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. ते तिहार कारागृहात 14X8 च्या सेलमध्ये आहेत. त्यांची पहिली रात्र अत्यंत अस्वस्थ अवस्थेत गेली. त्यांना झोपही लागली नाही. ते रात्री उशीरापर्यंत सेलमध्ये फिरताना दिसले. त्यांची शुगर लेवलही बरीच कमी झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना आवश्यक ती औषधेही देण्यात आली.
तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांना सोमवारी दुपारी चार वाजता तिहारमध्ये आणण्यात आले. सेलमध्ये पाठवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांची शुकर लेवल 50 पेक्षा कमी होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना आवश्यक औषधी देण्यात आली. महत्वाचे म्हणजे, पदावर असताना अटक झालेले केजरीवाल हे देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत. ते सध्या आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगात आहेत. पत्नी सुनीता आणि दोन मुले मंगळवारी त्यांची भेटू घेऊ शकतात.
माध्यमांनी सुत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, केजरीवाल यांना सायंकाळी चहा आणि रात्री घरचे जेवण देण्यात आले. त्यांना झोपण्यासाठी एक गादी, ब्लँकेट आणि दोन उशा देण्यात आल्या. केजरीवाल काही वेळ सिमेंटच्या प्लॅटफॉर्मवर झोपले. मात्र त्यांना झोप लागली नाही. ते रात्री उशिरा सेलमध्ये फिरताना दिसले. सकाळीही त्यांची शुगर लेवल खालावलेली होती. ते तिहार कारागृहातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
केजरीवाल यांची शुगर लेवल नॉर्मल होईपर्यंत त्यांना घरचे जेवण घेण्याची परवानगी आहे. यामुळे त्यांचे दुपारचे आणि रात्रीचे जेवण घरून येईल. केजरीवाल त्यांच्या सेलमध्ये सकाळी ध्यानधारणा करत होते. त्यांना सकाळी चहा-बिस्किटे देण्यात आली. सेलबाहेर दोन जेल वॉर्डर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कारागृह प्रशासन सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. याशिवाय सेलच्या बाहेर क्यूआरटी टीमही तैनात करण्यात आली आहे. केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 21 मार्चला अटक करण्यात आली आहे.