सरदार सरोवराच्या पाणीसाठ्यात मोठी घट, १.७ लाख मृत झाडे हटवण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:42 AM2018-03-08T01:42:50+5:302018-03-08T03:49:08+5:30
नर्मदा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सरदार सरोवर धरणातील पाणी साठा कमी होत चालल्याने पाण्याखाली बुडालेली मृत झाडे आणि मंदिरे दिसू लागली आहेत. वन विभागाने सुमारे पावणेदोन लाख मृत झाडे हटवण्याचे काम सुरू केले असून, मंदिरांजवळ लोक दर्शनासाठी जमू लागले आहेत.
वडोदरा - नर्मदा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सरदार सरोवर धरणातील पाणी साठा कमी होत चालल्याने पाण्याखाली बुडालेली मृत झाडे आणि मंदिरे दिसू लागली आहेत. वन विभागाने सुमारे पावणेदोन लाख मृत झाडे हटवण्याचे काम सुरू केले असून, मंदिरांजवळ लोक दर्शनासाठी जमू लागले आहेत.
धरणातील पाण्याची पातळी १०७ मीटरच्या खाली गेली आहे. उपवनसंरक्षक शशीकुमार यांनी सांगितले की, वन विभागाने धरणक्षेत्रातील १.७ लाख मृत झाडे हटवण्यासाठी ७० कर्मचाºयांना नियुक्त केले आहे. हे काम मार्च अखेरीस पूर्णत्वास जाईल. ही मृत झाडे न हटविल्यास धरणाच्या एकूण पाणी साठवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही झाडे हटविण्याखेरीज पर्याय नाही.
नर्मदा तालुक्यात नदीच्या पात्रातील पुरातन हफेश्वर मंदिरही आता दिसू लागले आहे. लोक भक्तिभावाने दर्शनासाठी या मंदिरात जात आहेत. मंदिरापासून १५ किलोमीटरवर असलेल्या कवंत येथून भाविक बोटीने मंदिरापर्यंत जात आहेत. (वृत्तसंस्था)
मृत साठा वापरात
मुख्य सचिव डॉ. जे. एन. सिंग म्हणाले की, मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीने नदीपात्रातील असलेल्या कामात लक्ष घातले असल्याने घाबरण्याचे कारण नाही.
धरणातील पाण्याचा साठा ४५ टक्क्यांनी कमी आहे. नर्मदा प्राधिकरणाने परवानगी दिल्यानंतर गुजरात राज्याने धरणातील पाण्याचा डेड स्टॉक वापरण्यास सुरुवात केली आहे. १३५ शहरे आणि १० हजार गावांसाठी हे पाणी वापरले जाते.