लिफ्टमध्ये कुत्र्याने घेतला मुलाचा चावा, मालकाला 10 हजारांचा दंड ठोठावला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:55 AM2022-11-17T09:55:11+5:302022-11-17T09:56:03+5:30
Dog Attack: मुलाच्या उपचाराचा खर्चही कुत्र्याच्या मालकाला द्यावा लागणार आहे.
नोएडा : येथीस बिसरख पोलीस स्टेशन परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याप्रकरणाची चौकशी ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने केली. यात दोषी आढळल्यानंतर कुत्र्याच्या मालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही माहिती सोशल मीडिया व माध्यमातून मिळाल्याचे येथील प्राधिकरणाचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमचंद यांनी सांगितले.
एका सोसायटीत राहणाऱ्या कार्तिक गांधी यांच्या कुत्र्याने त्याच सोसायटीत राहणाऱ्या रुपेंद्र श्रीवास्तव या मुलाचा लिफ्टमध्ये चावा घेतला होता. कुत्र्याच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे डॉ. प्रेमचंद यांनी सांगितले. तसेच, ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने कार्तिक गांधी यांना 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम आठवडाभरात प्राधिकरणाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. मुलाच्या उपचाराचा खर्चही कुत्र्याच्या मालकाला द्यावा लागणार आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे डॉ. प्रेमचंद यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री कार्तिक गांधी यांच्या कुत्र्याने मुलाचा चावा घेतला होता. त्याच्या वडिलांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलीस आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरणाला या घटनेची माहिती दिली. दरम्यान, ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने कुत्र्यांची वाढती भीती लक्षात घेऊन नवीन धोरण आणले आहे. यानुसार, कुत्रा चावल्यास उपचाराचा खर्च मालकाला करावा लागणार असून 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.
याआधी नोएडामध्येही कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अशा घटना समोर आल्या होत्या. गेल्या महिन्यातच आठ महिन्यांच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला केला होता. कुत्र्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर बराच गदारोळ झाला होता.