उत्तर भारतात महापुराचे थैमान
By admin | Published: August 25, 2016 06:24 AM2016-08-25T06:24:08+5:302016-08-25T06:24:08+5:30
उत्तर भारतातील पाच राज्यांना महापुराचा जोरदार फटका बसला असून, अनेक नद्या पात्राबाहेर आल्या आहेत.
उत्तर भारतातील पाच राज्यांना महापुराचा जोरदार फटका बसला असून, अनेक नद्या पात्राबाहेर आल्या आहेत. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. अलाहाबादेत पुराचे पाणी शहरात पोहोचले आहे आणि गंगेचे रूप सागराप्रमाणे दिसू लागले आहे. उत्तर प्रदेशातून एक लाखाहून अधिक, तर बिहारमधील पूरग्रस्त भागातून जवळपास सहा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पुरामुळे उत्तर प्रदेशात नऊ, बिहारमध्ये १५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच मध्य प्रदेशातही अनेकांचा बळी गेला आहे. गंगा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा २३ सेंमीवरून वाहत आहे. कालिचक ब्लॉक नं. ३, माणिकचक आणि रतुआ ब्लॉक नं. १ या भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. सिंचन विभागाचे एक उच्चस्तरीय पथक या भागाचा दौरा करीत असून, आपला अहवाल ते सादर करणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
>बोटीत झाला बाळाचा जन्म
पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी जात असताना एका महिलेने बोटीतच बाळाला जन्म दिला. सुदैवाने एनडीआरएफमधील फार्मासिस्ट त्या वेळी बोटीवर उपस्थित होते. त्यांनी बाळंतपणासाठी तिला मदत केली.
१३५ घरे गेली वाहून
मालदा : पश्चिम बंगालमधील गंगा नदी मालदा जिल्ह्यात धोक्याची पातळी ओलांंडून वाहत आहे. या पुरात १३५ घरे वाहून गेली आहेत, तर २० गावांत पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिक बेघर झाले आहेत. मालदातील अतिरिक्त जिल्हाधिकारी कांचन चौधरी यांनी सांगितले की, बिननगर भागातील १३५ घरे या पुरात वाहून गेली आहेत, तर या पुरामुळे अनेक रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.