हिरव्या पाचूने नटलेले नयनरम्य ठिकाण
By admin | Published: January 18, 2017 05:24 AM2017-01-18T05:24:57+5:302017-01-18T05:24:57+5:30
स्वर्गाची सफर करायची असेल तर धर्मशाला येथे येऊन धौलाधार पर्वतराजी जरूर पाहा.
धर्मशाला : स्वर्गाची सफर करायची असेल तर धर्मशाला येथे येऊन धौलाधार पर्वतराजी जरूर पाहा. निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर स्वर्गाहून कमी नाही. चोहीकडे हिरवीगार वनराई, पाम वृक्षांनी डवरलेले डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात. धर्मशाला हे हिमाचल प्रदेशातील इतर शहरांहून अधिक उंचावर वसलेले असून, निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षणांचा आनंद लुटण्यासाठी हे सर्वात चांगले ठिकाण आहे.
योगा, विपश्यना, निसर्गोपचार, स्पा याशिवाय कँप फायर, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग यासारख्या साहसी क्रीडा प्रकारांचाही येथे आनंद घेता येतो. धर्मशाळा म्हणजे दलाई लामा यांचे निवासस्थान आणि त्यांच्या नेतृत्वाखालील विजनवासातील तिबेटी
सरकारचे हे मुख्यालय आहे. चीनने तिबेटचा कब्जा केल्यानंतर तिथून बाहेर पडलेल्या तिबेटी जनतेने दलाई लामा यांच्या नेतृत्वाखाली इथे हे सरकार स्थापन केले. त्यामुळे इथे तिबेटी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.
धर्मशालाच्या प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये त्रियुंडचा समावेश आहे. पर्वताच्या शिखरावर वसलेल्या त्रियुंडला धर्मशालाचे मुकुट म्हटले जाते. त्रियुंडच्या पुढे इंद्रहार ग्लेशियर आहे. मॅक्लोडगंज येथून २ कि.मी. पुढे भागसुनाग मंदिर आहे. येथून जवळच स्नानासाठी तयार करण्यात आलेला तलाव आणि धबधबा आहे.
धर्मशाला येथून ११ कि.मी.वर नड्डी गावात डल सरोवर आहे. गिर्यारोहक या सरोवरचा तळ छावणी म्हणून उपयोग करतात. या सरोवरात स्नान केल्यास सर्व दु:ख दूर होते, अशी श्रद्धा आहे. या सरोवराजवळ एक मंदिर असून ते दूर्वास ऋषींना समर्पित आहे.
करेरी हे ठिकाण सर्वांत सुंदर पिकनिक पॉइंट म्हणून लोकप्रिय आहे. अल्पाईन हिरवळ आणि देवदारच्या जंगलाने वेढलेले हे ठिकाण ठिकाण आहे. धर्मकोट : भागसुनागजवळच धर्मकोट हे गाव आहे. धर्मकोटला मिनी इस्रायलही म्हटले जाते. या गावात तुम्हाला विदेशी आणि इस्रायली लोकच सर्वाधिक भेटतील.