ग्रीनपीसकडून भारतीय चहा उद्योगास घातपाताचा प्रयत्न
By Admin | Published: April 13, 2015 11:33 PM2015-04-13T23:33:24+5:302015-04-13T23:33:24+5:30
हानिकारक कीटकनाशक असल्याचा प्रचार परदेशात करून ग्रीनपीस इंडिया भारतीय चहा उद्योगाचे मोठे नुकसान करीत असल्याचा गृहमंत्रालयाचा आरोप आहे.
नवी दिल्ली : भारतात पिकविण्यात येत असलेल्या चहाच्या पानात हानिकारक कीटकनाशक असल्याचा प्रचार परदेशात करून ग्रीनपीस इंडिया भारतीय चहा उद्योगाचे मोठे नुकसान करीत असल्याचा गृहमंत्रालयाचा आरोप आहे. भारतीय चहा उद्योगात तब्बल ३५ लाख कर्मचारी कामाला असून या उद्योगाने गेल्या वर्षी निर्यातीतून ६४.४ कोटी डॉलरची कमाई केली आहे.
ग्रीनपीस इंडियाच्या कारवायांबद्दल गृहमंत्रालयाने केलेल्या अहवालानुसार या अशासकीय संघटनेने ‘ट्रबल ब्रुर्इंग आॅन इंडियन टी’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात चहामध्ये हानिकारक, असे कीटकनाशक असल्याचे म्हटले आहे. ग्रीनपीसचा असा दावा आहे की भारतातील प्रमुख चहा कंपन्यांच्या (ब्रँडस्) उत्पादनात हानिकारक कीटकनाशक आढळले आहेत. हे सगळे ब्रँडस् अमेरिका, ब्रिटन व युरोपमध्ये निर्यात केले जातात, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. ग्रीनपीसने फोरेन्सिक विश्लेषण प्रसिद्ध केलेले नाही. गुप्तहेरांकडून समजलेल्या माहितीनुसार हे विश्लेषण युरोपमधील कोणत्या तरी देशातील खासगी प्रयोगशाळेत करण्यात आले आहे.
भारतीय चहा मंडळाला हे निष्कर्ष मान्य नाहीत व हे निष्कर्ष भारताच्या चहा निर्यातीवर परिणाम करणारे आहेत, असे मंडळाचे मत आहे. ग्रीनपीसची चहाविरोधी मोहीम ही चिनी चहा कंपन्यांच्याविरोधातील मोहिमेसारखीच आहे. एप्रिल २०१२ मध्ये ग्रीनपीसने असाच वादग्रस्त अहवाल ‘चिनी चहामध्ये लपलेले तत्त्व’ या नावाने प्रसिद्ध केला होता. त्यात १८ नमुन्यांमध्ये २९ वेगवेगळी कीटकनाशके सापडल्याचा दावा केला होता. ग्रीनपीसने गहू, तांदूळ अशा धान्यांनाही लक्ष्य केले असून
त्यात होणारा कीटकनाशकांचा दुरुपयोग समोर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
४जगातील प्रमुख चहा उत्पादक देशांत भारताचे स्थान आहे. भारतात तयार होणारा चहा जगातील सर्वात उत्तम चहा समजला जातो. आसाम, दार्जिलिंग व उत्तर बंगालचा दुआब हा पूर्वोत्तर भारत प्रमुख चहा उत्पादक क्षेत्र आहे. याशिवाय दक्षिण भारतातील निलगिरी हा भागही प्रमुख चहा उत्पादक आहे.
४चहा क्षेत्र देशात रोजगार देणारा दुसरा प्रमुख उद्योग आहे. १५०० पेक्षा जास्त चहाच्या बागांमध्ये ३५ लाखांपेक्षाही जास्त कर्मचारी आहेत. २०१४ मध्ये भारतात ११८.५० कोटी किलो चहाचे उत्पादन झाले होते.