लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 08:41 PM2023-04-20T20:41:39+5:302023-04-20T20:42:11+5:30
आज दुपारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला झाला. या घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत.
Attack on Army Soldiers:जम्मू-काश्मीरमध्ये आज(दि.20) दुपारी लष्कराच्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत 5 जवानांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, एक जवान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दहशतवादी हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना जैश समर्थित PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
या घटनेनंतर एडीजीपी जम्मू आणि इतर वरिष्ठ अधिकारी पूंछमध्ये पोहोचले आहेत. लष्कराकडून सांगण्यात आले आहे की, गुरुवारी दुपारी 3 वाजता राजौरी सेक्टरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी हँड ग्रेनेडचाही वापर केल्याने वाहनाला आग लागली. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत हा दहशतवादी हल्ला झाला.
लष्कराच्या माहितीनुसार, या भागात दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान या घटनेत शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुःख व्यक्त केले आहे.
PAFF म्हणजे काय?
पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट म्हणजेच PAFF ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद समर्थित दहशतवादी संघटना आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरच PAFF चे नाव समोर येऊ लागले. ही दहशतवादी संघटना अन्सार गझवत-उल-हिंदचा मारला गेलेला कमांडर झाकीर मुसा याच्याकडून प्रेरित आहे. हा जागतिक दहशतवादी संघटना अल कायदाचाही एकनिष्ठ मानला जातो.