बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 20:32 IST2025-04-17T20:03:55+5:302025-04-17T20:32:31+5:30

Punjab Crime: पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणात भारतीय लष्कराच्या जवानाला अटक करण्यात आली आहे.

Grenade attack on Youtuber house in Jalandhar Army jawan had given bomb throwing training online | बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण

बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण

Jalandhar Grenade Attack:पंजाबमधील जालंधर येथे एका युट्यूबरच्या घरावर ग्रेनेड फेकल्याच्या प्रकरणात पोलिसांनी एका लष्करी जवानाला अटक केली आहे. ग्नेनेड हल्ला प्रकरणात भारतीय लष्कराच्या जवानाला अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका लष्करी जवानाने ग्रेनेड हल्ला करणाऱ्याला बॉम्ब फेकण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले होते. हा लष्करी जवान सोशल मीडियाद्वारे आरोपीला प्रशिक्षण देत होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेल्या या जवानाला आरोपीला ऑनलाइन प्रशिक्षण दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

जालंधरमधील युट्यूबर रॉजर संधूच्या घरावर ग्रेनेड फेकणारा हरियाणातील यमुना नगरमधील शादीपूर गावच्या हार्दिक (२१) याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान हार्दिकला एका सैनिकाने ग्रेनेड फेकण्याचे इन्स्टाग्रावर प्रशिक्षण दिल्याचे समोर आले. जालंधर ग्रामीण पोलिसांनी या सैनिकाला अटक केली आहे. शीख रेजिमेंटचे सैनिक सुखचरण सिंग याने हार्दिकला सोशल मीडियावर ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण दिले होते. सुखचरण सिंग हा मुक्तसर येथील रहिवासी असून तो जम्मूमधील शीख रेजिमेंटमध्ये तैनात आहे.

सुखचरणला माहित नव्हते की तो ज्या व्यक्तीला ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण देत होता तो जालंधरमधील रसूलपूर येथील युट्यूबरच्या घरावर हल्ला करणार आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोह आणि इतर कलमे लावलेली नाहीत. सोशल मीडियावर देशविरोधी घटकांना प्रशिक्षण दिल्याबद्दल सुखचरणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानात बसलेल्या शहजाद भट्टीच्या सूचनेवरून हार्दिकने हा ग्रेनेड फेकला होता. या घटनेत दोन जणांचा समावेश होता. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या झीशान अख्तरशीही हार्दिकसोबत संबंध आहेत. २५ हजार रुपयांसाठी त्याने हे काम केल्याचे समोर आले.

गेल्या महिन्यात १६ मार्च रोजी पहाटे ४ वाजता युट्यूबर रॉजर संधूच्या घरावर ग्रेनेड फेकण्यात आला होता. मात्र तो फुटला नाही. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी गँगने एक व्हिडिओ जारी करून हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. युट्यूबरने इस्लाम आणि मुस्लिमांविरुद्ध टिप्पण्या केल्या होत्या, असे व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. भट्टी गँगने पुन्हा हल्ला करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हार्दिकला हरियाणा येथून अटक केली. चौकशीदरम्यान हार्दिकने लष्करी जवान सुखचरण सिंगने त्याला ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले.

दरम्यान, गेल्या चार-पाच महिन्यांत अमृतसर आणि गुरुदासपूरमधील पोलिस चौक्यांना लक्ष्य करून बॉम्बस्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात अमृतसरमधील एका मंदिराबाहेर स्फोट झाला होता. ८ एप्रिल रोजी जालंधर जिल्ह्यातील भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या निवासस्थानी हातबॉम्बचा स्फोट झाला.

Web Title: Grenade attack on Youtuber house in Jalandhar Army jawan had given bomb throwing training online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.