पंजाबमध्ये माजी मंत्र्यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला; पाकिस्तानातून आयएसआयने केला हल्ला, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:41 IST2025-04-08T18:38:39+5:302025-04-08T18:41:48+5:30
पंजाबमध्ये माजी मंत्र्यांच्या घरावर ग्रेनेड हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पंजाबमध्ये माजी मंत्र्यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला; पाकिस्तानातून आयएसआयने केला हल्ला, दोघांना अटक
Punjab Crime: पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर काल रात्री दहशतवादी हल्ला झाला. ई-रिक्षातून आलेल्या काही लोकांनी त्याच्या घरात ग्रेनेड फेकला, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. हल्ल्याच्या वेळी माजी मंत्री त्यांच्या घरात झोपले होते. त्यांच्यासोबत यावेळी त्यांचे कुटुंबिय देखील होते. या हल्ल्यामुळे परिसरात खबराट पसरली आहे. मात्र पंजाबपोलिसांनी १२ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपीला अटक केली आहे.
पंजाबमधील जालंधरमध्ये भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर हल्ला झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा जालंधरमधील शास्त्री मार्केट चौकात हा सगळा प्रकार घडला. सोमवारी रात्री १२:३० ते १:०० च्या दरम्यान भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरी ग्रेनेडचा स्फोट झाला. हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी भाजप नेत्याच्या घरासह संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. ई-रिक्षातून आलेल्या तिघांनी मनोरंजन कालिया यांच्या घरावर ग्नेनेड फेकला.
आता या हल्ल्याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी यांनी अवघ्या १२ तासांत ग्रेनेड हल्ल्याचा गुंता सोडवला आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर हल्ल्यात वापरलेली ई-रिक्षा देखील जप्त करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे एक मोठा कट होता ज्यामध्ये दहशतवादी आणि गुंडांच्या नेटवर्कचे संबंध उघडकीस आले आहेत. या हल्ल्याचा मास्टरमाइंड झीशान अख्तर आहे, जो कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. पोलिसांना बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणात झीशान आधीपासून हवा होता.
या हल्ल्यातील पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा आणि गँगस्टर हॅपी पासिया यांच्या संबंधांचाही पोलिस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात हल्ला करण्यासाठी सूचना आणि पाठिंबा भारत-पाकिस्तान सीमेपलीकडून मिळाला होता अशी माहिती समोर आली आहे. जालंधर पोलिसांनी १२ तासांच्या आत २ ग्रेनेड फेकणाऱ्यांना अटक केली. रविंदर कुमार आणि सतीश उर्फ काका उर्फ लक्का यांना पोलिसांनी अटक केली आहे.