हृदयद्रावक! कॅन्सरपीडित आईच्या मृत्युमुळे शोक अनावर, २० वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 02:03 PM2021-10-28T14:03:42+5:302021-10-28T14:33:59+5:30
Family News: कर्करोगामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर शोक अनावर झालेल्या एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
उना (हिमाचल प्रदेश) - कर्करोगामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर शोक अनावर झालेल्या एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यात घडली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार उना जिल्ह्यातील उपमंडल गगरेट अंतर्गत संघनेई गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये कर्करोगग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेच्या शोक अनावर झालेल्या मुलीने दु:खाच्या आवेगात विषप्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केली.
संघनेई गावातील ही महिला गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगग्रस्त होती. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास हतबलता व्यक्त केली. त्यामुळे तिचे नातेवाईक घरीच तिच्यावर उपचार करत होते. या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. या महिलेची २० वर्षीच मुलगी आईच्या जाण्याचे दु:ख सहन करू शकली नाही. त्यातच तिने विषप्राशन केले. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची गंभीर अवस्था पाहून तिला विभागीय रुग्णालयात उना येथे पाठवण्यात आले आहे. मात्र उपचारांदरम्यान, या तरुणीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांकडे सोपवला आहे. गावातील सरपंच त्रिलोक कुमार यांनी सांगितले की, या मुलीची आई दोन वर्षांपासून कर्करोगाशी झगडत होती. रात्री उशिरा तिच्या मृत्यूनंतर मुलीची प्रकृतीही बिघडू लागली. तेव्हा तिचे नातेवाईक तिला रुग्णालयात घेऊन गेले, तिथे तिचा मृत्यू झाला. उनाचे एसी अर्जित सेन यांनी या घटनेला दुजोरा देत या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याचे सांगितले.