नोटा मोजता येईनात; नववधूने मंडपातच दिला नवरदेवाला डच्चू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:30 PM2019-03-18T15:30:23+5:302019-03-18T15:31:03+5:30
लग्नसमारंभांमध्ये हुंडा मागितला म्हणून किंवा मद्यप्राशन करून धिंगाना घातला म्हणून लग्ग मंडपातून वधूने वरात मागे पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत.
पंडौल : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील पंडौल गावामध्ये एका नवरीने नवरदेव अशिक्षित असल्याच्या कारणावरून गळ्यात माळ पडलेली असतानाही धाडस दाखविले आहे. 100 च्या नोटा चक्क तीनवेळा प्रयत्न करूनही नीट मोजता न आल्याने तिने लग्न मोडत वऱ्हाडींना माघारी पाठविले. हे तिचे धाडस पाहून मंडपात उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने त्यांच्या शिकलेल्या मुलाशी लग्नाचा प्रस्ताव देत लग्न लावून दिले.
हे प्रकरण 13 मार्चचे आहे. याआधीही बऱ्याच लग्नसमारंभांमध्ये हुंडा मागितला म्हणून किंवा मद्यप्राशन करून धिंगाना घातला म्हणून लग्ग मंडपातून वधूने वरात मागे पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, ही घटना वेगळीच आहे. पंडौल येथील ब्रम्होत्तरा गावातील मुलाचे लग्न मोमीनपूर गावातील मुलीशी 13 मार्चला ठरले होते. लग्न लागले. वरमाळाही घातल्या. यानंतर मंडपामध्ये नववधूच्या मैत्रिणी नवरदेवासोबत गप्पा मारत होत्या. तेव्हा त्यांना नवरदेव अशिक्षित असल्याची शंका आली. यामुळे नववधूच्या मैत्रिणींनी त्याला अनेक प्रश्न विचारले, मात्र तो या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही.
यामुळे या मैत्रिनींनी या नवरदेवाला शंभराच्या 10 नोटा मोजण्यास सांगितले. मात्र, तीन वेळा संधी देऊनही त्याला या नोटा किती आहेत आणि एकून किती मुल्य होते याबाबत सांगता आले नाही. यानंतर गोंधळलेल्या नवरदेवाला त्याचे आणि गावाचे नावही विचारण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याचे नाव विचारताच त्याने पंडौल असे सांगितले. या उत्तरांवरून हा नवरदेव अशिक्षित असल्याचे लक्षात आले. त्यांनी नववधूला ही बाब सांगितली. यावर नववधूने धाडस दाखवत गळ्यात वरमाला पडलेली असतानाही लग्न मोडले आणि वरातींनी माघारी पाठवून दिले.
यावेळी या लग्नाला उपस्थित असलेल्या एक व्यक्तीने तिच्या या धाडसाचे कौतूक करत त्याच्या शिकलेल्या मुलाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. माझा मुलगा चांगला शिकलेला आहे, तू त्याच्याशी लग्न करशील का? असे म्हणत मागणी घातली. यावर मुलीकडच्यांनी काही वेळ विचार करत लगेचच होकार देत लग्नाचा बार उडवून दिला.