हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवाचा मृत्यू, 1 दिवसापूर्वीच झालेलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:01 IST2023-12-11T11:54:05+5:302023-12-11T12:01:15+5:30
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये नवरदेवाचा मृत्यू झाला.

हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवाचा मृत्यू, 1 दिवसापूर्वीच झालेलं लग्न
जम्मू-काश्मीरच्या सांबामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये नवरदेवाचा मृत्यू झाला. सांबा येथे झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर सांबा येथील नानके चक गावाजवळ एक ट्रक अचानक उलटला आणि कारला धडक दिली.
एक दिवस आधीच लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सांबा येथे कारमध्ये दोघेजण बसले होते. 27 वर्षीय रोमी आणि 28 वर्षीय सुशील कुमार कारमध्ये बसले होते. सुशील कुमारचं लग्न एक दिवसापूर्वी झालं होतं आणि ते दोघं रिसेप्शनसाठी जात होते. सांबा येथे जात असताना अपघात झाला.
सांबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या साहाय्याने कारमधून दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी सांबा जिल्हा रुग्णालयात पाठवून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. सुशील कुमारची वाट पाहत असलेल्या नातेवाईकांना या घटनेने फार मोठा धक्का बसला आहे.
एक दिवस आधी लग्न झाल्यामुळे घर आनंदाने भरून गेले होते, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. रिसेप्शनची देखील जोरदार तयारी करण्यात आली होती. पण नवरदेवाच्या मृत्यूने आनंदावर विरजण पडलं. नववधूला या घटनेने फार मोठा धक्का बसला आहे. परिसरात शोककळा पसरली आहे. हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे.