शेतकऱ्यांच्या आंदोलनाला असाही पाठिंबा; नवरदेव ट्रॅक्टरवरुन पोहोचला लग्न मंडपात
By मोरेश्वर येरम | Published: December 4, 2020 03:02 PM2020-12-04T15:02:00+5:302020-12-04T15:04:24+5:30
हरियाणात एका नवरदेवानं अनोख्या पद्धतीने शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे.
कर्नाल
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून सतत चर्चेच्या फैरी झडत असल्या तरी शेतकरी संघटकांनी कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे.
देशातून विविध स्तरांमधून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. माजी खेळाडूंनी पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा देत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. तर सेलिब्रिटींनीही ट्विट करत आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. हरियाणाच्या कर्नाल येथील एका नवरदेवानं अनोख्या पद्धतीने शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे.
लग्न मंडपात पोहोचण्यासाठी नवरदेव आलिशान कारमधून निघाला होता. पण एका शेतकऱ्याचा ट्रक्टरपाहून त्यानं कारमधून बाहेर पडून ट्रॅक्टरवरुन लग्न मंडपात पोहोचण्याचा निर्णय घेतला. नवरदेव थेट टॅक्टरवर बसून लग्न मंडपात पोहोचला. या कृतीतून आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत असल्याचं तो म्हणाला.
"आपण शहरात राहत असलो तरी शेती हे आपलं मूळ आहे. शेतकरी हीच आपली प्राथमिकता असायला हवी. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असणाऱ्या शेतकरी बांधवांना जनतेचाही पाठिंबा आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं म्हणून मी ट्रॅक्टरवरुन येण्याचा निर्णय घेतला", असं नवरदेवानं सांगितलं.
Haryana: Groom in Karnal leaves his luxury car behind & rides a tractor to his wedding venue to show support to farmers' protest.
— ANI (@ANI) December 4, 2020
“We might be moving to city but our roots are farming. Farmers should be priority. We want to send message that farmers have public support,” he says pic.twitter.com/KUgJkLleAy