नवरी जोमात, नवरदेव कोमात! 'तो' हनिमूनची वाट पाहत होता; पैसे, दागिने घेऊन पळाली नववधू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:26 PM2024-03-27T12:26:27+5:302024-03-27T12:28:44+5:30
लग्नानंतर सासरच्या घरी आलेल्या नववधूने हनिमूनच्या दिवशी असं काही केलं ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये लग्नानंतर सासरच्या घरी आलेल्या नववधूने हनिमूनच्या दिवशी असं काही केलं ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नवरीने घरात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री ही घटना घडली. नवरदेव रात्री खोलीत वधूची वाट पाहत होता, परंतु नवरी पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळून गेली.
नवऱ्याने आता न्याय मिळावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पैसे आणि दागिने मिळावेत, अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालौन शहरातील एका आईला आपल्या मुलाच्या लग्नाची काळजी होती. त्यानंतर मध्यस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधून 70 हजार रुपये घेऊन मुलाचं लग्न लावून देण्यास सांगितलं. मध्यस्थांनी त्याचं लग्न गोरखपूरची रहिवासी पूजासोबत ठरवलं.
गेल्या आठवड्यात पूजा जालौन येथे आली आणि एका मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर पूजा तिच्या सासरच्या घरी पोहोचली जिथे वराने तिचे आनंदाने स्वागत केलं. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. मग जेव्हा रात्र झाली तेव्हा तरुण हनिमूनची वाट पाहत होता. मात्र लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वधूने दागिने, रोख रक्कम घेऊन पळ काढला.
तरुणाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाचे लग्न लावून देण्याबाबत लखन सिंग आणि चरण सिंग या दोघांशीही बोलणं झालं होतं. लग्नाच्या बदल्यात त्यांनी 70 हजार रुपये घेतले होते. पण लग्नानंतर आता वधूच पळून गेली आहे. या प्रकरणी जालौन पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विमलेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. तक्रारीवरून लग्न झालेल्या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरणाचा तपास सुरू आहे.