नवरदेवानं 'तिलक'चे ११ लाख रुपये केले परत, सासऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; कडकडून मिठी मारली!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:45 PM2022-02-09T16:45:06+5:302022-02-09T16:46:42+5:30
लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाला 'तिलक' म्हणून लाखो रुपयांची बरसात करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.
जयपूर-
राजस्थानमध्ये आता विवाह सोहळ्यांमधील प्रथा-परंपरांना छेद देत सामाजिक भान जपण्याच्या दृष्टीनं मोठा बदल घडताना पाहायला मिळत आहे. लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाला 'तिलक' म्हणून लाखो रुपयांची बरसात करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यात मुलीच्या वडीलांची संपूर्ण आयुष्याची पुंजी लग्नात हुंडा म्हणून खर्च होते. पण आता समाजात हुंडा घेणं किती चुकीचं आहे याबाबतची जनजागृती झाल्यानंतर याचं प्रमाण देखील कमी झालं आहे. तिलक स्वरुपात दिलेला ११ लाख रुपयांचा हुंडा नवरदेवानं वधूच्या वडीलांना परत करुन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याची एक घटना समोर आली आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका लग्न सोहळ्यात वधूच्या पित्यानं नवरदेवाला हुंड्याच्या निमित्तानं ११ लाख रुपयांची रक्कम 'तिलक' म्हणून देऊ केली. पण नवरदेव आणि त्याच्या वडीलांनी संपूर्ण रक्कम वधूच्या वडीलांना परत केली. नवरदेव शैलेंद्र सिंह राठोड आणि त्याचे वडील विजय सिंह राठोड यांनी दाखवलेलं सामाजिक भान याचं परिसरात जोरदार कौतुक केलं जात आहे. राजस्थानमध्ये याआधी देखील अशी उदाहरणं समोर आली आहेत.
मूळचे राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील किशनपुरा येथील रहिवासी असलेले विजय सिंह राठोड जयपूरमध्ये राहतात आणि मालमत्ता व्यवसायाशी निगडीत ते काम करतात. विजय सिंह यांची पत्नी समुन शेखावत शिक्षिका आहेत. तर मुलगा म्हणजेच नवरदेव शैलेंद्र सिंह जयपूरच्या विद्युत वितरण निगम लिमिटेडमध्ये अकाऊन्टंट पदावर कार्यरत आहे. शैलेंद्रचा ५ फेब्रुवारी रोजी जयपूरच्या जोधपुरा येथील रहिवासी सुरेंद्र सिंह शेखावत यांची मुलगी कंचन शेखावत हिच्यासोबत विवाह झाला. कंचन उच्चशिक्षित असून एमएससी व बीएडपर्यंतचं शिक्षण तिनं पूर्ण केलं आहे. तसंच नेट परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे.
भावूक होऊन वधुच्या वडिलांनी व्याहींना मारली मिठी
लग्नात वधूचे वडील सुरेंद्र सिंह शेखावत यांनी नवरदेव शैलेंद्र सिंह याला तिलक म्हणून ११ लाख रुपये रोकड देऊ केले. पण नवरदेव आणि त्याच्या वडीलांनी ते सन्मानानं परत केले. शैलेंद्र सिंह यांनी घेतलेल्या निर्णयाचं उपस्थितांनी कौतुक केलं. तर वधूचे वडील सुरेंद्र शेखावत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी नवरदेवाच्या वडीलांना कडकडून मिठी मारली आणि आभार व्यक्त केले.