अरे बापरे! लग्नाआधी दातांची सर्जरी करायला गेला 28 वर्षांचा मुलगा; डेंटल क्लिनिकमध्ये मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 01:56 PM2024-02-20T13:56:49+5:302024-02-20T13:59:39+5:30
डेंटल क्लिनिकमध्ये डेंटल प्रोसीजरदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हैदराबादमधील FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये डेंटल प्रोसीजरदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय लक्ष्मी नारायण विंजाम याने आपल्या लग्नाआधी डेंटल प्रोसीजर बूक केली होती. मात्र त्यादरम्यान असं काही घडलं ज्यामुळे त्याला जीव गमवावा लागला आहे,
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 16 फेब्रुवारी रोजी लक्ष्मी नारायण 'स्माईल डिझायनिंग' प्रोसीजरसाठी ज्युबली हिल्सच्या रोड क्रमांक 37 येथील एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये गेला होता. संध्याकाळी जेव्हा त्याचे वडील विंजाम रामुलू यांनी फोन केला तेव्हा क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा प्रोसीजर दरम्यान बेशुद्ध झाला आहे.
लक्ष्मी नारायण याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं. जुबली हिल्स पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, 16 फेब्रुवारी रोजी प्रोसीजरदरम्यान त्याला एनेस्थीशिया दिल्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि ओवरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला.
तरुणाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून ज्युबली हिल्स पोलिसांनी एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकविरुद्ध आयपीसी कलम 304 ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे.