Gold Price: वाढता वाढता वाढे! सोने-चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:07 AM2020-07-29T05:07:57+5:302020-07-29T05:08:04+5:30
चांदी किलोला ६७,५०० रुपयांवर : सोने ५३,५०० प्रतिदहा ग्रॅम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जागतिक पातळीवर वाढलेली मागणी, त्याप्रमाणात नसलेला पुरवठा व सक्रिय झालेले दलाल तसेच अमेरिकन डॉलरचे वाढलेले दर यामुळे सोने-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. या भाववाढीने सोन्याला नवी झळाली मिळत सोने थेट ५३ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर तर चांदी ६७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. आठवडाभरात सोन्याच्या भावात अडीच हजार रुपये प्रतितोळा तर चांदीमध्ये सात हजार रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. या दोन्ही धातूंचे आतापर्यंतचे हे सर्वोच्च भाव आहे.
कोरोनाच्या संकटात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढून या मौल्यवान धातूंची मागणी वाढतच आहे. त्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने सोने-चांदीचे भाव वधारतच आहे. सोबतच या धातूंमधील वाढती गुंतवणूक पाहता दलालांकडूनही मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी वाढली आहे. यात भर म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वाढून ते ७५ रुपयांवर पोहोचले आहे. या सर्व कारणांमुळे सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे.
आतापर्यंतची मोठी वाढ
सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने नवनवे विक्रम गाठले जात आहे. सोन्याने पन्नास हजाराचा पल्ला ओलांडल्यानंतर आता ते थेट ५३ हजार ५०० रुपयांवर पोहोचल्याने आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. या सोबतच चांदीमध्येही अशाच प्रकारे आतापर्यंत सर्वात जास्त वाढ होऊन चांदीदेखील ६७ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. चांदीतदेखील सात हजार रुपयांची सर्वात मोठी वाढ ठरली आहे.
चांदी ८० हजार तर सोने ६० हजारांवर जाणार?
जागतिक पातळीवरील स्थिती पाहता भविष्यात सोने-चांदीत गुंतवणूक वाढणार असल्याने या मौल्यवान धातूंचे भाव वाढतच राहाणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये डिसेंबरपर्यंत चांदीचे भाव ८० हजार रु पये प्रतिकिलो तर सोने ६० हजार रु पये प्रतितोळ्यावर पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जागतिक पातळीवर मोठी खरेदी होत असली तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा नसल्याने तसेच गुंतवणूक वाढतच असल्याने सोने-चांदीते भाव वाढत आहेत. त्यात आता डॉलरचे दरही वधारले आहेत. त्यामुळे भाववाढीमध्ये भर पडत आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यात भाववाढ कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
- अजयकुमार ललवाणी,
अध्यक्ष, जळगाव शहर
सराफ असोसिएशन, जळगाव