राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध; १० लाख लोक रस्त्यावर उतरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:06 AM2022-05-10T10:06:56+5:302022-05-10T10:07:25+5:30
अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या घरापासून नवाबगंज भागात रॅली काढली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते
नवाबगंज – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात वाढता विरोध पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने उत्तर प्रदेशात रॅली काढण्यात आली आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी शक्तीप्रदर्शन करत राज ठाकरेंना कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही. आजच्या बैठकीला ५० हजार लोकं उपस्थित राहतील. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही तोवर त्यांना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही असा इशारा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केल्यापासून मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली. त्यानंतर येत्या ५ जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात आले. मात्र उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध वाढला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी संत-महंतांची बैठक होत आहे. या बैठकीला ५० हजार लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर राज ठाकरेंच्या विरोधाला १० लाख लोक येतील असंही सांगितले जात आहे.
अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या घरापासून नवाबगंज भागात रॅली काढली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. राज ठाकरेंनी माफी मागितली तरी त्यांना विरोध कायम राहणार नाही. माझी भूमिका बदलणार नाही. संत-महंतांनीही राज ठाकरे यूपीतील जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत विरोध करू अशी भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशातील वाढता दौरा लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ५ जूनच्या राज दौऱ्यावर मोठं संकट उभं राहिल्याचं चित्र उत्तर प्रदेशात दिसत आहे.
मागे हटणार नाही, आंदोलनावर ठाम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून आता राजकारण तापलं आहे. पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. "राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही" असं म्हटलं आहे.