मुर्मू यांना बिगर एनडीए पक्षांचा वाढता पाठिंबा; कोविंद यांच्यापेक्षा अधिक मते मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:08 AM2022-06-28T11:08:09+5:302022-06-28T11:09:15+5:30
एनडीएचा घटक पक्ष नसलेल्या बीजेडीने मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. वायएसआर-काँग्रेसने देखील अशीच भूमिका घेतली आहे. बसपनेही मुर्मू यांना समर्थन दिले आहे.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आदिवासी समाजाच्या नेत्या द्रौपदी मुर्मू यांना एनडीए तर्फे उमेदवारी देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. मोदी यांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. संसदेमध्ये ३७ राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यातील १६ पक्ष एनडीएच्या बाजूने आहेत. मात्र बिगर एनडीए पक्षांकडून मुर्मू यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे.
एनडीएचा घटक पक्ष नसलेल्या बीजेडीने मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. वायएसआर-काँग्रेसने देखील अशीच भूमिका घेतली आहे. बसपनेही मुर्मू यांना समर्थन दिले आहे. त्याशिवाय शिरोमणी अकाली दल, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (आरएलपी), आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एयूडीएफ) हे पक्ष देखील मुर्मू यांना पाठिंबा देउ शकतात.
जनता दल (एस)चे द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल चांगले मत आहे. लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी तीन अपक्ष खासदार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूचे आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आप, झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आदी पक्षांनी आश्वासन दिले होते. मात्र नेमके कोणाला मत द्यायचे याविषयी आता हे पक्ष पुन्हा खलबते करण्याची शक्यता आहे.
यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारी अर्जावर झामुमोचे प्रमुख हेमंत सोरेन हे अनुमोदक व्हावे काँग्रेसकडून प्रयत्न हाेते. मात्र सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी सोरेन उपस्थित नव्हते.
कोविंद यांच्यापेक्षा अधिक मते मिळणार?
२०१७ साली झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६६.३६ टक्के मते मिळून ते विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता त्यांना कोविंद यांच्यापेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.