दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 05:19 AM2020-12-07T05:19:59+5:302020-12-07T05:21:09+5:30
Farmer Protest : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदींनी पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्ली : पाटण्यात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करणारे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार सरकारला खुले आव्हान दिले आहे की, हिंमत असेल तर अटक करून दाखवा. अन्यथा, मी स्वत: अटक करून घेईन. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध राज्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
तेजस्वी यांनी ट्वीट केले आहे की, शेतकऱ्यांच्या मुद्यावर आवाज उठविला म्हणून डरपोक सरकारने माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांसाठी फाशीवर जायलाही मी तयार आहे. कृषी विधेयकांविरुद्ध गांधी मैदानात शनिवारी सभा घेणारे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांच्यासह १८ जणांविरुद्ध आणि ५०० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, असा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते चितरंजन गगन यांनी सांगितले की, प्रशासनाला शुक्रवारीच निवेदन दिले होते.
सोनू सूद, तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर आदींचे आंदोलनाला समर्थन
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदींनी पाठिंबा दिला आहे.
तसेच कंगना रानौत यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या शेरेबाजीला दिलजित दोसांझ यांनी दिलेल्या प्रत्युत्तराचे अनेक नामवंतांनी समर्थन केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास खेल रत्न पुरस्कार परत करू, असे विजेंदरसिंग यांनी जाहीर केले आहे.
उबदार कपड्यांसाठी गायक दिलजित यांचे १ कोटी
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीनजीक ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांची अभिनेता-गायक दिलजित दोसांझ यांनी शनिवारी भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच हिवाळा असल्यामुळे निदर्शकांनी उबदार कपडे विकत घ्यावेत यासाठी दोसांझ यांनी १ कोटी रुपयांची देणगीही दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात, असे आवाहन दिलजित दोसांझ यांनी केले आहे. या आंदोलनाबाबत अभिनेत्री कंगना रानौत हिने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्या शेरेबाजीला दिलजित दोसांझ यांनी प्रत्युत्तर दिले होते. दिलजित यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कधीही दुर्लक्ष होता कामा नये. शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असून सारा देश त्यांच्या पाठीशी आहे. या आंदोलकांनी एकदाही रक्तपाताची भाषा केलेली नाही.