फिटनेससाठी सायकल खरेदीकडे वाढतो आहे कल; चालू वर्षात होऊ शकते दशकातील सर्वाधिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:48 AM2021-06-03T06:48:33+5:302021-06-03T06:49:46+5:30

गतवर्षी विक्रीमध्ये झाली होती घट

growing trend towards buying bicycles for fitness | फिटनेससाठी सायकल खरेदीकडे वाढतो आहे कल; चालू वर्षात होऊ शकते दशकातील सर्वाधिक वाढ

फिटनेससाठी सायकल खरेदीकडे वाढतो आहे कल; चालू वर्षात होऊ शकते दशकातील सर्वाधिक वाढ

Next

नाशिक : देशभर सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे नागरिक आपल्या फिटनेसबाबत अधिक जागृत होत असून, त्यासाठी सायकल खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. प्रदूषणरहित तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यांवर चालविता येणारी सायकल ही पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र ठरू लागली आहे. एका संस्थेच्या अहवालानुसार या वर्षामध्ये देशातील सायकलची मागणी २० टक्क्यांनी वाढू शकते. तसे झाल्यास ही दशकातील सर्वाधिक वाढ ठरण्याची शक्यता आहे. 

पूर्वी सायकल असणे हे सुखवस्तूचे एक लक्षण मानले जायचे. कालांतराने देशामध्ये समृद्धी आली आणि सायकलची जागा स्वयंचलित वाहनांनी घेतली. गेल्या वर्षापासून जगावर घोंघावत असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे नागरिक आपला फिटनेस वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. हा फिटनेस वाढावा यासाठी सायकलला मागणी वाढत असून, सायकल खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. 

क्रिसिल या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार चालू आर्थिक वर्षामध्ये देशातील सायकलींची विक्री सुमारे २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षामध्ये देशात १.२ कोटी सायकली विकल्या गेल्या आहेत. मात्र, कोरोना नियंत्रणासाठीच्या निर्बंधांमुळे गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झालेली सायकल विक्री आता वेग घेण्याची शक्यता आहे. 

या वर्षामध्ये ही विक्री १.४५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ सायकलची विक्री २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वाढीचा हा वेग दशकातील सर्वाधिक राहण्याचा अंदाजही क्रिसिलने व्यक्त केला आहे. 

चार प्रकारांमध्ये विभागणी
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सायकल उत्पादक देश आहे. आपल्या देशातील सायकलींची विभागणी ही स्टॅण्डर्ड, प्रिमियम, मुलांसाठी आणि निर्यातीसाठी अशा चार प्रकारांमध्ये होत असते. यापैकी स्टॅण्डर्ड सायकलींचा एकूण विक्रीमधील वाटा ५० टक्के असतो. या प्रकाराचा मुख्य खरेदीदार सरकार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रिमियम आणि मुलांसाठीच्या सायकलींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दोन्ही प्रकारांचा एकूण विक्रीतील वाटा सुमारे ४० टक्के तर निर्यातीचा वाटा १० टक्के आहे. 

Web Title: growing trend towards buying bicycles for fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.