‘जीएसटी’ १ जुलैपासूनच
By admin | Published: June 19, 2017 02:52 AM2017-06-19T02:52:17+5:302017-06-19T02:52:17+5:30
स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) करव्यवस्था ठरल्याप्रमाणे येत्या १ जुलैपासूनच लागू होईल
नवी दिल्ली : स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) करव्यवस्था ठरल्याप्रमाणे येत्या १ जुलैपासूनच लागू होईल, असे रविवारी स्पष्ट झाले. यासाठी लागणाऱ्या आयटी यंत्रणेची सज्जता झाली नसल्याने व्यापार-उद्योग क्षेत्रातून व्यक्त केल्या गेलेल्या चिंतेची दखल घेऊन ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांचा कर साधा रिटर्न दाखल करून भरण्याची सवलतही सरकारने जाहीर केली.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलच्या १७ बैठकीत आयटी यंत्रणेच्या सज्जतेसह इतरही प्रलंबित मुद्द्यांचा समग्र आढावा घेण्यात आला. अंमलबजावणी पुढे ढकलणे शक्य नसल्याने जीएसटी
१ जुलैपासूनच लागू करण्याचे बैठकीत ठरले, असे जेटली यांनी
नंतर सांगितले. प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या आदल्या दिवशी ३० जून रोजी कौन्सिलची पुढील बैठक घेण्याचेही ठरले.
जीएसटीच्या पहिल्या दोन महिन्यांचे रिटर्नस आॅनलाईन भरण्यासाठी कंपन्यांना सवलत दिली जाईल म्हणजे त्यांना आॅनलाईन फायलिंगची व्यवस्था समजून घेता येईल. कंपन्यांना दर महिन्याला तीन आॅनलाईन रिटर्नस भरणे बंधनकारक आहे. नव्या व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी उशिरा रिटर्नस फाईल करण्याची सवलत द्यावी, असे आवाहन काही व्यावसायिकांनी केले होते.
जेटली म्हणाले की,जुलै व आॅगस्टचे रिटर्नस फाईल करण्यासाठी काहीशी सवलत दिली जाईल व सप्टेंबरपासून रिटर्नस फायलिंगची कठोरपणे अमलबजावणी केली जाईल.
कंपन्यांना जुलै आणि आॅगस्टचे रिटर्नस २० सप्टेंबरपर्यंत फाईल करण्याची सवलत असेल, असे वित्त मंत्रालयाचे सचिव हसमुख अधिया म्हणाले. एकदा जीएसटी पूर्णपणे अमलात आली की कंपन्यांना त्यांच्या विक्रीचे संपूर्ण रिटर्न पुढील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सादर करावेच लागेल, दुसऱ्या खरेदीचे रिटर्न १५ तारखेला आणि तिसऱ्या रिटर्नमध्ये त्यांच्या कराचा हिशेब असेल.
जुलै आणि आॅगस्टमधील व्यवहारनिहाय रिटर्नस उशिरा दाखल करण्याची सवलत मिळेल, असे अप्रत्यक्ष कर विभागाचे प्रमुख हरिशंकर सुब्रमणिअम यांनी सांगितले.
असे भरावे
लागतील रिटर्न
जुलै २०१७ साठी
जीएसटीआर-३ बी : २० आॅगस्ट
जीएसटीआर-१ : १ ते ५ सप्टेंबर
जीएसटीआर-२ : ६ ते १० सप्टेंबर
आॅगस्ट २०१७ साठी
जीएसटीआर-३ बी : २० सप्टेंबर
जीएसटीआर-१ : १६ ते २० सप्टेंबर
जीएसटीआर-२ : २१ ते २५ सप्टेंबर
जुलै २०१७ साठीचा ‘आऊटवर्ड सप्लाय’चा तपशील १५ जुलैपासून अपलोड करता येईल