जीएसटी विधेयक मंजुरीला आशेची पालवी
By admin | Published: November 28, 2015 02:12 AM2015-11-28T02:12:30+5:302015-11-28T02:12:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधून त्यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह चर्चेसाठी दिलेले निमंत्रण
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधून त्यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह चर्चेसाठी दिलेले निमंत्रण आणि त्यानुसार सायंकाळी उशिरा केलेल्या चर्चेमुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक पारित होण्याची आशा बळावली आहे. दीड वर्षाच्या काळात सोनिया गांधी प्रथमच पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या. त्याआधी लोकसभेत मोदींनी पं. जवाहरलाल नेहरूंसह अनेक पूर्वसूरींच्या योगदानाचा वारंवार उल्लेख केला. या बदलांमधून आशावादी संकेत मिळाले आहेत.
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची
त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या
भेटीत जीएसटी विधेयकासह संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविणे आणि मतैक्य निर्माण करणे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अनेक महत्त्वाच्या विधेयकांवरून सरकार आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेले वितुष्ट आणि काँग्रेसने जीएसटी विधेयक रोखल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मुख्य विरोधी पक्षाचे सहकार्य मिळविण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकताना मोदींनी सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांना आपल्या ७, रेसकोर्स या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता चहासाठी आमंत्रित केले होते. या बैठकीला वित्तमंत्री अरुण जेटली आणि संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू हेही उपस्थित होते. ‘सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते. ही बैठक ४५ मिनिटे चालली,’ असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांनी जीएसटी विधेयकावर उपस्थित केलेल्या तीन मुद्यांवर सरकार विचार करेल आणि आपला निर्णय घेईल. ही चर्चा सुरूच राहील, असे अरुण जेटली यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
—————
जीएसटी विधेयकावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी गेल्या १८ महिन्यांत पहिल्यांदाच सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान गाठले. कोंडी फोडण्याच्या दिशेने भाजपा आणि काँग्रेस यांच्यात झालेली ही प्राथमिक बैठक होती आणि उभय पक्ष मागील दोन दिवसांपासून समेट घडविण्याचाच सूर आळवत आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
————
भाजपा आणि काँग्रेस यांच्यात सुरू झालेली ही चर्चा पुढेही कायम राहील आणि संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू हे लवकरच काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतील. उद्योजकांसाठी १ टक्का कर, जीएसटी कर दरासाठी १८ टक्क्यांची संवैधानिक मर्यादा आणि जीएसटीसाठी वाद निवारण प्रणाली स्थापन करणे, अशा तीन अटी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी जीएसटी विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी पुढे केलेल्या आहेत. काँग्रेसच्या या मागण्या मान्य करण्याचे आणि जीएसटीवर मार्ग काढण्याचे संकेत याआधीच सरकारने दिले आहेत.
————-
काँग्रेस प्रवक्ते टॉम वडकम यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देण्यास नकार दिला. संपर्क साधण्यात आला आहे आणि ही नवी सुरुवात आहे, असे ते म्हणाले.
————-
लोकसभेत शुक्रवारी केलेल्या भाषणात मोदींनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा उल्लेख मोदींनी वारंवार केला. सायंकाळी सोनियांसोबत होणारी चाय पे चर्चा सुरळीत होण्यासाठीची पृष्ठभूमी त्यांनी यातून तयार केल्याचे मानले जाते. हजारो वर्षांपासून देश चालत आहे. त्रुटी समोर येतील. आवाज उठविला जाईल, आवाज उठले तरी समाजातूनच त्यावर तोडगा सुचविला जाईल. स्वत:हून चूक सुधारणे हीच आपली शक्ती आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.