जीएसटी अडवले!

By admin | Published: August 12, 2015 05:05 AM2015-08-12T05:05:58+5:302015-08-12T05:05:58+5:30

विरोधक घालत असलेला गोंधळ संपूर्ण देशाला दिसू द्या, अशी भूमिका घेत तशा सूचनाच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभा टीव्हीच्या चमूला दिल्या.

GST blocked! | जीएसटी अडवले!

जीएसटी अडवले!

Next

नवी दिल्ली : विरोधक घालत असलेला गोंधळ संपूर्ण देशाला दिसू द्या, अशी भूमिका घेत तशा सूचनाच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभा टीव्हीच्या चमूला दिल्या. हा गोंधळ देशाला दिसावा यासाठी कामकाज तहकूब न करता अध्यक्षांनी प्रश्नोत्तरांचा तास रेटला. त्याचवेळी काँग्रेसने मंगळवारी राज्यसभेचे कामकाज ठप्प पाडून वस्तू आणि सेवाकर विधेयक (जीएसटी) चर्चेसाठी मांडण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला. काँग्रेसच्या या कृतीने वित्तमंत्री अरुण जेटली कमालीचे संतापले. ‘त्यांना लोकसभा निवडणुकीतील पराभव अद्याप पचवता आलेला नाही,’ अशा शब्दांत जेटली यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
काँग्रेस पक्ष विकास आणि अर्थव्यवस्थेच्या मार्गात अडचणी निर्माण करीत आहे. सरकार राजकीय आणि संवैधानिक अशा सर्व प्रकारच्या उचित उपाययोजनांचा अवलंब करून जीएसटीला समर्थन देणाऱ्या पक्षांच्या मदतीने हे विधेयक पारित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, अशी घोषणा जेटली यांनी केली. २४५ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे ६८ सदस्य असणे ही सरकारची खरी अडचण आहे.

देशाचा विकास रोखणे हा यांचा मुख्य उद्देश आहे. अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा, असे काँग्रेसला मुळीच वाटत नाही. काँग्रेसने अन्य मुद्द्यांच्या आडून कामकाज बंद पाडू नये. अर्थव्यवस्थेच्या विकासाला विरोध आहे, हे स्पष्टपणे सांगून टाकावे. - अरुण जेटली

‘कामकाज सल्लागार समितीने चर्चा न केल्याने आणि समितीला त्यासाठी वेळ न दिल्याने या जीएसटी विधेयकावर चर्चा केली जाऊ शकत नाही,’ असे काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले.

जेटली हे जीएसटी विधेयक मांडण्यासाठी उभे राहताच काँग्रेसच्या सदस्यांनी ‘हे घटनादुरुस्ती विधेयक असल्याकारणाने अशा गोंधळाच्या वातावरणात मी हे विधेयक चर्चेसाठी घेऊ शकत नाही,’ असे सांगत उपसभापती पी.जे. कुरियन यांनी राज्यसभेचे कामकाज संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब केले.

राज्यसभेत भाजपाचे ४८ सदस्य आहेत आणि पक्षाला १२० सदस्यांचा पाठिंबा आहे. जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज असल्याने भाजपाला आणखी पाठिंबा मिळविण्याची आवश्यकता आहे.

Web Title: GST blocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.