धन धना धन! कोरोना संकटात मोदी सरकारसाठी पॉझिटिव्ह बातमी; हॅटट्रिकमुळे देशाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 07:30 PM2021-10-01T19:30:19+5:302021-10-01T19:35:16+5:30
मोदी सरकारला कोरोना संकटात दिलासा; जीएसटीमधून मोठा महसूल
नवी दिल्ली: नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं दणका दिला. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोना लाटेनं टोक गाठलं. देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यानं लॉकडाऊन करावा लागला. त्यानंतर आता हळूहळू देशाची अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. सप्टेंबरमध्ये देशाला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून १ लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारला जीएसटीमधून १.१७ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. लागोपाठ तिसऱ्या महिन्यात सरकारला जीएसटीमधून १ लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त झाला आहे. ऑगस्टमध्ये सरकारला जीएसटीमधून १.१२ लाख कोटींचा महसूल मिळाला होता. जुलैमध्ये हाच आकडा १.१६ लाख कोटी होता. त्याआधी जूनमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत ९२ हजार ८४९ कोटी रुपये जमा झाले होते. एप्रिल आणि मे महिन्यातही जीएसटीतून मिळालेलं उत्पन्न १ लाख कोटींहून अधिक होतं.
सितम्बर 2021 में जीएसटी राजस्व संग्रह
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) October 1, 2021
▪️सितम्बर 2021, महीने में सकल जीएसटी राजस्व संग्रह 1,17,010 करोड़ रुपये रहा
विवरणः https://t.co/T6MnbTXdTd@FinMinIndia
गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात २३ टक्के वाढ
गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न २३ टक्क्यांनी वाढलं आहे. तर २०१९ च्या सप्टेंबरच्या तुलनेत महसुलात झालेली वाढ २७ टक्के इतकी आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये मिळालेल्या महसुलासोबतच अर्थ मंत्रालयानं ई-वे बिलची आकडेवारीदेखील प्रसिद्ध केली आहे. ऑगस्टमध्ये ६.५८ कोटी ई-वे बिल तयार झाली. जुलैमध्ये हाच आकडा ६.४१ कोटी होता. विशेष म्हणजे कोविडशी संबंधित अनेक वैद्यकीय साहित्यांवर सूट दिल्यानंतरही सरकारला मिळणारा महसूल वाढला आहे.