Budget 2022: धन धना धन! अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मोदी सरकारसाठी मोठी गुड न्यूज; विक्रम थोडक्यात हुकला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:29 AM2022-02-01T09:29:15+5:302022-02-01T09:31:05+5:30
Budget 2022: अर्थमंत्री सीतारामन यांनी बजेट सादर करण्यापूर्वीच आली आनंदाची बातमी
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना संकटातून बाहेर पडणाऱ्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा अर्थसंकल्प सादर करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. वाढती महागाई, बेरोजगारांची वाढलेली संख्या, घसरता रुपया, निर्गुंतवणूक, खनिज तेलाचे वाढत असलेले दर अशी अनेक आव्हानं अर्थमंत्र्यांपुढे आहेत. महसूल वाढवायचा, पण त्याचवेळी करदात्यांना दिलासादेखील द्यायचा, अशा दुहेरी आव्हानाचा सामना अर्थमंत्री करत आहेत. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प सीतारामन यांची कसोटी पाहणारा आहे. सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मोदी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आहे.
२०२२ ची सुरुवात मोदी सरकारसाठी चांगली झाली आहे. जानेवारी महिन्यात १.३८ लाख कोटी रुपये इतका वस्तू आणि सेवा कर सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. सलग चौथ्या महिन्यात सरकारला जीएसटीच्या माध्यमातून १.३० लाख कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे जानेवारीत मिळालेला महसूल विक्रमाच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत मिळाले आहेत.
अर्थ मंत्रालयानं सोमवारी संध्याकाळी जीएसटीतून मिळालेल्या महसुलाचा आकडा जाहीर केला. त्यानुसार जानेवारीत १ लाख ३८ हजार ३९४ कोटी रुपये इतका महसूल जीएसटीच्या माध्यमातून मिळाला आहे. महसुलात थेट १५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल २०२१ मध्ये १ लाख ३९ हजार ७०८ कोटी रुपये महसूल मिळाला होता. हा विक्रम थोडक्यात हुकला आहे.