जीएसटी संकलनाचा झाला उच्चांक; डिसेंबरमध्ये झाली व्यवसायामध्ये वृद्धी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:04 AM2021-01-02T01:04:31+5:302021-01-02T07:05:34+5:30
१.१५ लाख कोटींचे संकलन : डिसेंबरमध्ये झाली व्यवसायामध्ये वृद्धी
नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यामध्ये देशभरातून जमा झालेल्या वस्तू आणि सेेवा कराने (जीएसटी) आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम मिळविली आहे. सलग तिसऱ्या महिन्यामध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा एकदा गतिमान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे शुक्रवारी डिसेंबर महिन्यामधील जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये १,१५,१७४ लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाल्याचे जाहीर झाले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून झालेले हे सर्वाधिक संकलन आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या करसंकलनापेक्षा यंदा १२ टक्के अधिक कर जमा झाला आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये १,०३,१८४ कोटी रुपयांचा जीएसटी संकलित झाला होता.
मार्च महिन्यामध्ये कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी, सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांना मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे ही वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
सलग तीन महिने लाख कोटींचा टप्पा पार
देशामध्ये १ जुलै, २०१७ रोजी जीएसटी करप्रणाली लागू करऱ्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत संकलित झालेल्या प्रत्येक महिन्याच्या जीएसटीमध्ये डिसेंबर, २०२०मध्ये संकलित कर हा सर्वाधिक आहे. या आधी एप्रिल, २०१९ मध्ये संकलित झालेला १,१३,८६६ कोटी रुपये हा जीएसटी सर्वेाच्च होता, तर एप्रिल, २०२० मध्ये संकलित ३२,१७२ कोटी रुपयांचा जीएसटी हा नीचांक आहे. डिसेंबर, २०२०मध्ये संकिलत झालेला जीएसटी हा गेल्या २१ महिन्यांमधील उच्चांकी आहे. त्याचप्रमाणे, गेल्या तीन महिन्यांमध्ये जीएसटी संकलनाने १ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे, हे वैशिष्ट्य आहे.
आयातीवरील करामध्ये २७ टक्के वाढ
डिसेंबर महिन्यामध्ये संकलित झालेल्या जीएसटीमध्ये आयात वस्तुंवरील कर मागील वर्षापेक्षा २७ टक्के तर देशांतर्गत उलाढलीवरील कर संकलन ८ टक्क्यांनी वाढले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. डिसेंबरच्या संकलनामध्ये केंद्रीय जीएसटी २१,३६५ कोटी, राज्यांचा जीएसटी २७,८०४ कोटी रुपये जमा झाला आहे. इंटिग्रेटेड जीएसटी ५७,४२६ कोटी रुपये असून, सेस ८,५७९ कोटी रुपये जमा झाल्याचे सूत्रांनी जाहीर केले.