जीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फिश टॅक्स, ममता बॅनर्जींनी ट्विटरवरुन मोदींवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 07:44 PM2017-11-06T19:44:09+5:302017-11-06T19:47:04+5:30
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.
मोदी सरकारने देशात जीएसटी लागू केल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जीएसटी म्हणजे एकप्रकारे 'ग्रेट सेल्फिश टॅक्स'असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी नोटाबंदीविरोधात सुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी म्हणजे एकप्रकारची देशावर उद्भवलेली आपत्ती होती. तसेच, देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करणा-या नोटाबंदी विरोधात सोशल मीडियाचा वापर करणा-यांनी येत्या 8 नोव्हेंबरला आपल्या अकाउंटचे प्रोफाईल पिक्चर बदलून काळे पिक्चर ठेवावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
Great Selfish Tax (GST) to harass the people.To take away jobs. To hurt businesses. To finish the economy. GoI totally failed to tackle #GST
— Mamata Banerjee (@MamataOfficial) November 6, 2017
ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर असे म्हटले आहे की, लोकांचा छळ करणारा ग्रेट सेल्फिश टॅक्स (जीएसटी). नोक-या काढून घेणारा. व्यवसायाचे नुकसान करणारा. अर्थव्यवस्था संपविणारा. जीएसटीच्या मुद्यावरुन सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. तर, दुस-या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, नोटाबंदी एक आपत्ती होती. अर्थव्यवस्थेचे नुकसान करणा-या या घोटाळ्याविरोधात येत्या आठ नोव्हेंबरला सर्वांनी आपल्या ट्विटर अकाउंटचा डिस्प्ले पिक्चर बदलून काळा ठेवावा.
#Noteban is a disaster. On #Nov8BlackDay to protest against this scam that destroyed the economy, let us also change our Twitter DP to black pic.twitter.com/yrheSPiZE5
— Mamata Banerjee (@MamataOfficial) November 6, 2017
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला येत्या आठ नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून 18 विरोधी पक्षांकडून देशभरात येत्या आठ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे फसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.