"GST ची टीम आली...पळा पळा", एका अफवेनं शहरातील दुकानं धडाधड बंद झाली, दुकानदार पळाले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 04:16 PM2022-12-16T16:16:32+5:302022-12-16T16:16:52+5:30
जीएसटीमुळं सरकारच्या तिजोरीत कराच्या स्वरुपात भरपूर श्रीमंत नांदत असली तरी व्यापारी मात्र आजही जीएसटीवर खूश नाहीत.
लखनौ-
जीएसटीमुळं सरकारच्या तिजोरीत कराच्या स्वरुपात भरपूर श्रीमंत नांदत असली तरी व्यापारी मात्र आजही जीएसटीवर खूश नाहीत. अनेकांना नुकसानही भोगावं लागत आहेत. त्यात जीएसटी न भरणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. कारण सरकारकडून कडक कारवाई देखील केली जात आहे. त्यात जीएसटी छापेमारीच्या अफवेचं एक वेगळंच पेव सध्या फुटलं आहे. जीएसटी छापेमारीच्या भीतीतून व्यापारी वर्ग अजूनही बाहेर पडलेला नाही.
गोरखपूर शहरात काल संध्याकाळी व्यापाऱ्यांचं हब मानलं जाणाऱ्या गोलघर स्थित बलदेव प्लाझा आणि इतर ठिकाणी जीएसटीचं पथक छापेमारीसाठी आल्याची अफवा पसरली. मग काय गोलघरमधील दुकानांसह पांडेयहाता, घंटाघर, रेतीचौक, नखास चौक, बक्शीपूरपासून ते अलीनगरपर्यंत दुकानं बंद झाली. दुकानदारांनी जीएसटी अधिकाऱ्यांच्या भीतीपोटी धडाधड दुकानं बंद करण्यास सुरुवात केली. दुकानांना टाळी लावली आणि दुकानदार घरी निघून गेले. तर काहींनी दुकानाचं शटर अर्धवट बंद केलं होतं.
"व्यापारी काही पीडित नाही आणि कोणत्याही व्यापारावरचा अन्याय सहन केला जाणार नाही. निवडणुकीचा काळ पाहून व्यापाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. विभागाकडून व्यापाऱ्यांबाबत चोर शब्दाचा वापर केला जात आहे ते आधी बंद झालं पाहिजे. तसंच सर्व व्यापाऱ्यांनी कोणत्याही भीतीविना व्यापार करावा. कुणालाही घाबरण्याची गरज नाही", असं चेम्बर ऑफ कॉमर्सच अध्यक्ष संजय सिंघानिया म्हणाले. तर चेंबर ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष अनुप किशोर म्हणाले की, सरकारला कर देणं देखील गरजेचं आहे. जर विकासाची आपली अपेक्षा असेल तर कर द्यावाच लागेल. त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेत व्यापाऱ्यांनी सर्वात आधी स्वत: रजिस्ट्रेनश करावं असं वारंवार आम्ही सांगत असतो.
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
पटरी व्यापारी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर कुमार झा म्हणाले, एका बाजूला अधिकारी असं सांगत आहेत की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यावरच धाड टाकली जात आहे. पण ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे अशा दुकानांवरही लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण कोणतीही पूर्वसूचना न देता व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जसं की ते दहशतवादी आहेत"